धाराशिव कारखान्याच्या अधिकाऱ्यास कोटीचा गंडा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धाराशिव : भामट्याने साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे भासवून एका अधिकाऱ्यास तब्बल एक कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार धाराशिवमध्ये १५ एप्रिल ते १७ एप्रिलच्यादरम्यान घडला आहे. यासंदर्भात धाराशिव साखर कारखान्याचे अधिकारी बाबासाहेब वाडेकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अमर पाटील यांचे छायाचित्र वापरून व त्यांची ओळख असल्याचे भासवून अज्ञात भामट्याने साखर कारखान्यात अधिकारी असलेले बाबासाहेब वाडेकर यांच्या मोबाईलवर १५ एप्रिल रोजी सकाळी पावणेसात वाजल्यापासून ते १७ एप्रिलच्या मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्यादरम्यान अनेकवेळा फोन आला. विशेष म्हणजे, संपर्क साधणाऱ्या ‘त्या’ अज्ञात व्यक्तीने आपल्या ‘डीपी’ला चेअरमन अमर पाटील यांचे छायाचित्र वापरले होते. भामट्याने स्वतःची ओळख लपवून अमर पाटील असल्याचे भासवून बँक खाते क्रमांक २०१०००४३४६६४६४ वर पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. सातत्याने फोन येत असल्याने अपेक्षित खातरजमा न करता वाडेकर यांनी १ कोटी १० लाख रुपये पाठविले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुरुवारी चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याचे अधिकारी बाबासाहेब वाडेकर यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »