जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : शेतकऱ्यांना ऊस पेमेंट तत्काळ द्या

बीड : उसगाळप हंगाम २०२५-२६ चा आढावा घेताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांना ऊसाचे बिल तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले.
एफ.आर.पी. ऊस नियंत्रण कायदा १९६६ नुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पेमेंट देणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत गाळपाचे आकडे, शेतकऱ्यांना दिलेली रक्कम, बंद व सुरू असलेले कारखाने याबाबत सविस्तर चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांना दिलेल्या ऊस बिलाचा आढावा घेण्याची घोषणा केली. गुळ पावडर फॅक्टरीच्या प्रतिनिधींनाही शेतकऱ्यांचे पैसे वेळेत देण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, प्रादेशिक उपसंचालक (साखर) साहेबराव जेधे, विशेष लेखा परिक्षक एस. एस. सुपेकर यांच्यासह जिल्ह्यातील कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते.






