डॉ. बुधाजीराव मुळीक यांना बँकॉक येथे ‘फाउंडेशन फेलो’ सन्मान प्रदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : प्रसिद्ध कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांना बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी परिषदेमध्ये ‘फाउंडेशन फेलो’ सन्मान प्रदान करण्यात आला.

दी थाई सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्स आणि एशियन असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी परिषदेचे २२ ते २४ मे दरम्यान बँकॉक येथे आयोजन करण्यात आले होते. ‘स्मार्ट ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग फॉर रिझिलियंट अँड सस्टेनेबल वर्ल्ड’ हा परिषदेतील चर्चेचा विषय होता.

या परिषदेत डॉ. मुळीक यांचा कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘फाउंडेशन फेलो’ पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शालिनीदेवी यांच्यासमवेत स्वीकारला. या कार्यक्रमासाठी डॉ. मुळीक यांच्या अमेरिकेतील ज्येष्ठ कन्या शिल्पा मुळीक वॉशिंग्टनहून आवर्जून आल्या होत्या. त्या अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी खात्यात उच्च पदावर आहेत. ‘फाउंडेशन फेलो’ हा सन्मान मिळवणारे डॉ. मुळीक हे एकमेव भारतीय कृषी अभियंते ठरले आहेत. यापूर्वी या नावाने हा सन्मान देण्यात आलेला नाही, यापुढे तो ‘फेलो’ या नावाने दिला जाणार आहे.

Dr. Budhajirao Mulik with daughter Shilpa.
बँकॉक विमानतळावर श्री. व सौ. मुळीक यांच्यासमवेत कन्या शिल्पा

जगभरातील २० देशांतील नामवंत कृषी अभियंते, तज्ज्ञ, संशोधक, उद्योजक या परिषदेला उपस्थित होते.
शेती क्षेत्रात 2030 पर्यंत कोणते बदल होतील, यावर डॉ. मुळीक यांनी प्रकाश टाकला. ड्रोन, एआय, रोबोट तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीचे चित्र आमूलाग्र बदलेल, असे ते म्हणाले.

यावेळी सौ. शालिनीदेवी मुळीक यांनी मनोगत व्यक्त करताना, डॉ. मुळीक यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल अभिमान व्यक्त केला आणि आयोजकांचे आभार मानले. तसेच डॉ. मुळीक यांनीही एशियन असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्सचे माजी अध्यक्ष डॉ. गजेंद्र सिंग, माजी महासचिव डॉ. विलासराव साळोखे आणि त्यांच्या चमूचे विशेष आभार व्यक्त केले. डॉ. गजेंद्र सिंग हे ‘आयसीएआर’चे माजी उपमहासंचालक आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी संचालक आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »