पवारांकडे प्रचंड पैसा हा गैरसमज – डॉ. सायरस पूनावाला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेचे अध्यक्ष आणि साखर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे देशाचे ज्येष्ठ नेते खा. श्री. शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे कॉलेज जीवनापासूनचे घट्ट मित्र, प्रसिद्ध उद्योगपती डॉ. सायरस पूनावाला ( अध्यक्ष, पूनावाला समूह) यांचा हा खास लेख .. ..

Dr. Cyrus Poonawala
Dr. Cyrus Poonawala

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात शिकत असताना सुरुवातीच्या वर्षांत माझी आणि शरदची तशी काही ओळख नव्हती. घरची कामं वगैरे उरकून मी मोटार घेऊन महाविद्यालयात यायचो. तेव्हा महाविद्यालयात मोटार घेऊन येणारे विद्यार्थी नव्हते. माझी ती मोटार मीच डिझाईन केलेली होती. एकदा मी मोटार घेऊन महाविद्यालयात गेलो असताना शरदनं मला थांबवलं. मी मोटार अक्षरशः त्याच्या गुडघ्याजवळ नेऊन थांबवली. त्यावरून आमचा वाद सुरू झाला, वादावादी करतच आम्ही महाविद्यालयाच्या उपाहारगृहात गेलो आणि तिथ आमचा वाद शमला.

शरद पवार आणि माझ्या मैत्रीची ती सुरुवात होती… शरदची आणि माझी ओळख १९५९ पासूनची… त्या प्रसंगानंतर झालेली आमची मैत्री आज साठ वर्षांनंतरही टिकून आहे. शरद बारामतीहून शिक्षणासाठी पुण्यात आलेला आणि मी मूळचा पुण्याचाच… शरद महाविद्यालयात शिकत असतानाच चळवळीत कार्यरत होता.

त्यावेळी तो सिटी ग्रुप स्टुडंट नावाच्या गटाचा प्रमुख होता, मी कॅम्पमधील मुलांचं नेतृत्व करत होतो, पण माझा तसा चळवळीशी वगैरे संबंध नव्हता. त्यात पुन्हा माझी मतं वेगळी होती, मी अतिशय स्पष्टवक्ता होतो. मात्र, मोटारीच्या त्या घटनेनंतर आमची चांगली ओळख झाली. आमची मैत्री होण्याची ती सुरुवात होती. आम्ही वरचेवर भेटायला लागलो. आम्ही कधीतरी डेक्कन जिमखान्यावरच्या पूना कॉफी हाऊसला जायचो, कधी कधी अलका टॉकिजजवळच्या शरदच्या खोलीवर जायचो. आमचं मैत्र घट्ट होण्यास विठ्ठल मणियारसारख्या मित्रांचा मोठा वाटा आहे.
शरद महाविद्यालयात आमच्या वर्गाचा प्रतिनिधी आणि कॉलेजचा नेता म्हणून निवडला गेला होता, असं मला स्पष्ट आठवतं. शरदकडे सुरुवातीपासूनच दूरदृष्टी होती, असं मला वाटतं.

महाविद्यालयात असताना शरदच्या वागण्या- बोलण्यातून त्याचा आत्मविश्वास, विषय समजून घेण्याची तयारी, नेतृत्व गुण दिसायचे. अर्थात पूर्णवेळ राजकारणात जाण्याबाबत त्यानं कधी बोलून दाखवलं नव्हतं. कालांतराने शरद राजकारणात गेला, मी राजकारणात गेलो नाही. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. मुंबईला जाताना कधी कधी डेक्कन क्वीनमध्ये आमच्या भेटी व्हायच्या. त्यावेळी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा व्हायच्या. एकदा असेच आम्ही डेक्कन क्वीनमध्ये भेटलो होतो. त्यावेळी माझं लग्न झालेलं नव्हतं. तर शरद मला म्हणाला, की त्यानं लग्न केलं आणि पूर्णवेळ राजकारणाच्या क्षेत्रात काम करत आहे. शरदन ते सांगितल्यावर मला आश्चर्य वाटलं होत. काही काळान मी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा कारखाना पाहायला शरदला बोलावलं आणि तो आवर्जून आलाही होता.


मला वाटतं, की शरद राजकारणाइतकाच उत्तम व्यावसायिक किंवा उद्योजक आहे. त्यामुळेच त्याची अनेक उद्योजकांशी मैत्री झाली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यानं अनेकांना मदत केली. उदाहरण सांगायचं झालं, तर मोठा उद्योग असलेल्या दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले होते आणि ते वाद बरेच विकोपाला गेले होते. त्या उद्योगात अनेक कर्मचारी कार्यरत होते. त्या वादाचा परिणाम त्या उद्योगावर आणि पर्यायानं तेथील कर्मचाऱ्यांवरही होत होता. शरदला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यानं त्या दोन्ही कुटुंबातला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. त्याची माजी मंत्री र. के. खाडिलकर यांच्याशी माझी खूप चांगली मैत्री होती. एकदा त्यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यावेळी शरदचा विषय निघाला. “तुम्ही शरद पवारांना ओळखता का ?” खाडिलकरांनी मला विचारल. “हो ओळखतो की, माझा वर्गमित्र आहे तो.” अस मी म्हणालो. त्यावर खाडिलकर म्हणाले, “तुमच्या मित्रावर नीट लक्ष ठेवा. राजकारणात खूप मोठा होण्याचे गुण त्याच्यात आहेत.” खाडिलकरांचे ते शब्द आजही मला आठवतात. खाडिलकरांना शरदमधील नेतृत्व गुण, त्याच्यातल्या क्षमतेचा अंदाज त्यावेळीच आला होता.

कुटुंबांमधील वाद न्यायालयाच्या बाहेरच मिटवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. त्यामुळे माझ्यासाठी शरद राजकारणी नाही. कारण शरदन अनेक गोष्टी राजकारणाच्या पलीकडे जाऊन, मतांचा विचार न करता केलेल्या आहेत. त्याचाच एक किस्सा असा, की शरद देशाचा संरक्षणमंत्री झाला होता. माझ्या एका ओळखीच्यांना रशियाबरोबर संरक्षण साहित्याच्या उत्पादनासंदर्भात काहीतरी व्यवहार करायचा होता. त्यासाठी त्या व्यक्तीचे प्रयत्न सुरू होते. तर ती व्यक्ती शरदला जाऊन भेटली. त्यान त्याचं काम सांगितलं. काम करून देण्यासाठी त्यानं शरदकडे मदत मागून त्या मदतीच्या बदल्यात पक्षासाठी निधी वगैरे देण्याची तयारीही दाखवली. ते पैशाचं वगैरे राहू द्या, असं सांगून शरदन ते काम होण्यासाठी आवश्यक ती मदत केली. ती व्यक्ती अक्षरशः चकित होऊन मला म्हणाली, “असे कसे ते पवार, पैसे वगैरे विचारल्यावर नको म्हणाले… उलट तुमच्या कामातून देशाला फायदा होणार असेल तर ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही काम सुरू करा.”…..तर आमचा शरद असा आहे.

महाराष्ट्राचा आणि पर्यायानं देशाचा विकास होण्यास उद्यमशीलता महत्त्वाची ठरणार आहे याची शरदला कल्पना होती. त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योग विकसित करणं हे त्याचं उद्दिष्ट होत. त्यामुळेच त्यानं कायमच उद्योगांना, उद्योजकांना मदत करण्यास प्राधान्य दिलं. जितके जास्त उद्योग निर्माण होतील, तितकी त्यातून रोजगार निर्मिती होईल, गरिबांच्या हाताला काम मिळेल आणि पर्यायानं विकासही होईल हे त्याला कळत असल्यानं, आपलं उद्दिष्ट साध्य करण्यात त्यान कधी राजकारण आणल नाही, की कधी मतांचा विचार केला नाही. बारामती

हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. बारामती आणि परिसरात शरदन उद्योग निर्माण व्हावेत या दृष्टीन उद्योगांना जागा दिली. या उद्योगांतून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती झाली आणि त्यातून बारामती परिसराचा झालेला विकास आपण पाहू शकतो. शरदनं त्याच्या भागात केलेल्या कामामुळेच आज पवार कुटुंबातल कोणीही निवडणुकीत उभं असलं, तरी सहजपणे निवडून येऊ शकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योगांना मदत करताना शरदन कधीच ‘बिझनेस डील केलं नाही. म्हणजे एखाद्याला मदत केली म्हणून त्या बदल्यात स्वतःसाठी काहीतरी घेण किंवा पक्षासाठी निधी घेणं असं काहीही त्यान केलं नाही. एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं घ्यायच ही शरदची वृत्तीच नाही. लोक म्हणतात, की शरद पवारांकडे खूप पैसे आहेत, पण तस काही नाही. लोक उगाच त्याची बदनामी करतात.

शरदच्या उद्योगांना मदत करण्याच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत आघाडीवर गेला अस म्हटल तरी वावगे ठरणार नाही. शेती, शेतीपूरक उद्योग, वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने महाराष्ट्रात उभे राहण्यासाठी त्यानं खूप मेहनत केली. देशाविदेशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून माहिती घेतली. तिकडच्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे कशा आणता येतील, त्या अधिक चांगल्या प्रकारे कशा राबवल्या जातील, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कोणत्या गोष्टीना प्राधान्य द्यायला हवं याचा शरदन बारकाईन विचार केला. त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यान सातत्यपूर्ण पद्धतीनं प्रयत्न केले, त्यासाठी आवश्यक ती धोरण निर्माण केली.

शरद महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, पण देशाचा पंतप्रधान होण्याची शरदला मिळालेली संधी हुकली हे खरोखरच दुर्दैव आहे. शरद देशाचा पंतप्रधान झाला असता, तर त्यानं देशाच्या पातळीवर खूप चांगलं काम केलं असतं असं मला वाटतं. उद्योग क्षेत्राचा देश पातळीवर अधिकाधिक विकास होण्यात, उद्योगपूरक धोरण निर्माण होण्यात त्यानं फार चांगलं काम केलं असत. पण शरदन केलेल्या कामाविषयी मला नेहमीच आदर आणि अभिमान वाटत आला आहे. शरदविषयी चांगल्या गोष्टी सांगतानाच, शरदच्या प्रशासक असण्यातील एक उणीवही मला जाणवते. नोकरशाहीबद्दल शरदनं ठाम भूमिका घेतली नाही. म्हणजे असं, की एखादा निर्णय घेतल्यावर त्याची योग्य पद्धतीन आणि योग्य त्या वेगानं अंमलबजावणी न झाल्यास त्या दिरंगाईचा उद्योगांवर परिणाम होतो. अशा वेळी दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शरदन कारवाई करायला हवी होती. पण तसं झाल नाही.
शरदमध्ये उत्तम प्रशासकीय गुण असले, तरी तो नोकरशाहीवर अवलंबून राहिला हेही तितकंच खरं आहे. या बद्दल मी त्याला अनेकदा बोललोही आहे. अर्थात एखाद्या बाबतीत शरदन ठरवल तर ते काम किती झटपट होऊ शकत याचीही अनेक उदाहरण आहेत.

बऱ्याच बाबतीत माझी आणि शरदची मत वेगळी आहेत. मात्र एका मुद्दयावर आमचं एकमत होत ते म्हणजे कुटुंबनियोजन. म्हणूनच आम्ही दोघंही एकाच मुलावर थांबलो. आमची एवढ्या वर्षांची मैत्री असूनही आम्ही एकमेकांकडे कधी काही मागितलं नाही. शरद माझ्यासाठी कधीच राजकारणी नव्हता. महाविद्यालयीन काळापासून मी, शरद, ईश्वरदास चोरडिया, विठ्ठल मणियार, धनाजी जाधव, श्रीनिवास पाटील, संभाजी पाटील असे दहा पंधरा जण आजही एकत्र आहोत. आजही आम्ही भेटतो, एकत्र जेवतो, गप्पांच्या मैफिली रंगतात. कधी माझ्या घरी, कधी विठ्ठलच्या घरी, कधी शरदच्या घरी… आमच्या गप्पांमध्ये उद्योग-व्यवसाय, राजकारण असे विषय नसतात.

माझी पारशी मराठी असल्यानं जरा वेगळी आहे. माझ्या मराठी बोलण्यामुळे होणाऱ्या हास्यविनोदांत शरद सहभागी होतो, चेष्टामस्करीही करतो. शरदची स्मरणशक्ती दांडगी असल्यानं आमच्या गप्पांमध्ये महाविद्यालयीन जीवनातल्या प्रसंगांना तो उजाळा देतो. त्यातले काही प्रसंग आमच्या विस्मृतीत गेलेले असतात. त्याच्या या स्मरणशक्तीच मला नेहमीच कौतुक वाटतं. किस्से रंगवून सांगण्याची त्याची अशी खास शैली आहे. मित्रांच्या अडीअडचणीच्या प्रसंगात तो धावून येतो.
शरद राजकारणात गेला नसता तर तो उत्तम उद्योजक झाला असता असं मला अगदी ठामपणे वाटतं. त्याला शेतीची उत्तम समज आहे. त्यामुळे शेती, शेतीपूरक व्यवसायात त्यानं नक्कीच चांगलं काम केल असतं. त्याच्यात उत्तम व्यावसायिक होण्याचे सगळे गुण आहेत. महाराष्ट्रात उद्योगांना प्राधान्य देतानाच शेती क्षेत्राचा विकास होण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केले. शेतीच्या बाबतीत महाराष्ट्र आणि देश स्वयंपूर्ण होण्यात शरदची भूमिका फार महत्त्वाची ठरली आहे. देशाचा कृषिमंत्री म्हणून त्यानं दिलेलं योगदान फार मोठं आहे. माझ्या मित्राचा, शरदचा आजपर्यंतचा प्रवास, वाटचाल नक्कीच अभिमान वाटावा अशी आहे. माझ्या या मित्राला दीर्घायुष्य लाभो, अशी शुभेच्छा!

(‘अष्टावधानी’ पुस्तकातून साभार. हे पुस्तक वाचनीय आहे.)

जीवनपट
१९६४ – युवक काँग्रेसचे अध्यक्ष
१९६७ – अवघ्या २७ व्या वर्षी राज्य विधानसभेवर निवड, बारामती मतदार संघातून पवारांना उमेदवारी देण्यास तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी सक्त विरोध दर्शविला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विरोध डावलून शरद
पवार यांनाच उमेदवारी दिली व ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ – प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे चिटणीस


१९७२-७४ – गृह, अन्न, नागरीपुरवठा, पुनर्वसन, प्रसिद्धी, क्रीडा व युवक कल्याण खात्यांचे राज्यमंत्री. १९७२ मध्ये वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होत असताना मंत्र्यांच्या यादीत पवारांचे नाव नव्हते. तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पवारांना संधी देण्याची शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सर्व खात्यांचे राज्यमंत्रिपद तेव्हा पवारांकडे होते.


१९७४-७८ – शिक्षण, कृषी, उद्योग, गृह, कामगार आणि युवक कल्याण खात्यांचे मंत्री


१९७८-८० – मुख्यमंत्री. पुलोदचा प्रयोग. जनता लाटेतही राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसला प्रत्येकी ६९ व ६२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस फुटीनंतर यशवंतराव चव्हाण, शरद पवार हे सारे रेड्डी काँग्रेसमध्ये होते. तेव्हा जनता पक्षाला ९९ जागा मिळाल्या होत्या, अशा त्रिशंकू अवस्थेत दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आणि वसंतदादा पाटील हे रेड्डी काँग्रेसचे मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. पण हे सरकार काही स्थिर नव्हते आणि उभयतांमध्ये संबंधही फारसे चांगले नव्हते. इंदिरा काँग्रेसच्या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांवर टीका सुरू केली. त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी इंदिरा काँग्रेसशी जुळवून घेण्यावर भर दिला. ही बाब रेड्डी काँग्रेसमधील नेत्यांना रुचली नाही.

हे सरकार पाडून जनता पक्षाच्या मदतीने पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला होता. जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान चंद्रशेखर हे सुद्धा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी अनुकूल होते. हे सरकार रडतखडत सुरू असतानाच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले.

मग शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील फुटीर आमदारांचा गट, जनता पक्ष व अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने पुरोगामी लोकशाही आघाडीचे (पुलोद) सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये रेड्डी काँग्रेस, समाजवादी, शेकाप, जनसंघ सहभागी होते. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शरद पवारांची निवड झाली होती. राज्याच्या इतिहासात आतापर्यंत सर्वांत कमी वयात मुख्यमंत्रिपदाचा मान पवारांना मिळाला.

१९८० – शरद पवार यांचे सरकार बरखास्त, सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सत्ता मिळाली. काँग्रेस विरोधी विचारांची राज्य सरकारे बरखास्त करण्याला काँग्रेसने प्राधान्य दिले. त्यातूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोदचे सरकार बरखास्त करण्यात आले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, त्यानंतर १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली.


१९८१-८४ – विरोधी पक्षनेता विधानसभा, तेव्हा पवार हे अर्स काँग्रेसमध्ये होते.


१९८४ – लोकसभेवर निवड इंदिरा लाटेत विरोधी पक्षाचा दारुण पराभव झाला, पण बारामती मतदार संघातून अर्स काँग्रेसच्या वतीने पवार हे निवडून आले होते. १९८५ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत समाजवादी काँग्रेसचे नेतृत्व करताना निवडून आल्यावर पवारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.


१९८५-८६ – विरोधी पक्षनेता, विधानसभा, तेव्हा पवारांच्या नेतृत्वाखाली ५४ आमदार निवडून आले होते.


१९८६ – काँग्रेसमध्ये प्रवेश, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला देशभर यश मिळाल्यावर पवारांनी काँग्रेसमध्ये परतावे, असे प्रयत्न सुरू झाले. बदलते राजकीय वातावरण लक्षात घेऊन पवारांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. समाजवादी काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात आले. औरंगाबादमध्ये राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पवारांचे विरोधी पक्षनेतेपद गेले. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना पवारांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते.


१९८८-९० – दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, काँग्रेसमध्ये फेर प्रवेश केल्यावर मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. अनेक धोरणात्मक निर्णय त्यांनी तेव्हा घेतले. याच काळात शिवसेना आणि भाजपची युती आकारास आली. मराठवाड्यात शिवसेनेने तेव्हा बाळसे धरले होते. १९९०च्या निवडणुकीत पवार आणि काँग्रेसपुढे शिवसेना-भाजप युतीचे आव्हान होते. पवारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला १४१ जागा मिळाल्या.


१९९०-९१ – तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्रिपदी पवारांची फेरनिवड झाली. काहीच महिन्यांत विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, रामराव आदिक आदींनी पवाराच्या विरोधात बंड पुकारले. पण दिल्लीने पवारांच्या बाजूने कौल दिला.
१९९१ – दिल्लीच्या सत्ता केंद्रात प्रवेश, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कॉंग्रेसमध्ये नेतृत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. शरद पवारांनी तेव्हा पंतप्रधानपदासाठी प्रयत्न केले होते. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती. केंद्र सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्री.


१९९३ – चौथ्यांदा मुख्यमंत्री. राज्याच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर काँग्रेसने राज्याची सूत्रे पुन्हा पवारांकडे सोपविली. ६ मार्च १९९३ ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि आठवडाभरातच मुंबईत बॉम्बस्फोटाची मालिकाच घडली. पवारांनी अत्यंत संयमाने साऱ्या परिस्थितीला तोड दिले. मुंबई पूर्वपदावर आणली. मुंबईत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीच्या जखमा ताज्या असताना बॉम्बस्फोटानंतर जातीय वातावरण कलुषित होणार नाही याची खबरदारी घेतली.

यातून राज्य सावरत असतानाच ३० सप्टेंबरला मध्यरात्री लातूरजवळील किल्लारीला बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर मदत व पुनर्वसनात पवारांनी केलेल्या कामाचे देशभर कौतुक झाले. सारी सरकारी यंत्रणा तैनात होण्यापूर्वी पवार हे सकाळीच लातूरला पोहोचले होते. पुढे काही काळ तेथेच मुक्काम करून मदतीकडे लक्ष दिले. मुख्यमंत्रीच घटनास्थळी असल्याने सारी यंत्रणा कार्यान्वित झाली.


१९९४ – शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय झाला. १० वर्षांपासून जास्त काळ आंदोलन आणि हिंसाचार झालेल्या मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यापुढील एक मोठा सामाजिक प्रश्न सोडविला होता. वर्षभराने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नामविस्ताराचा धाडसी निर्णय पवारांनी घेतला. राज्याच्या समन्यायी विकासासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास मंडळे याच काळात स्थापन झाली.
या विकास मंडळांमुळे अनुशेषग्रस्त भागाला निधी मिळण्यात मदत झाली. देशात महिला धोरणाचा पाया प्रथम पवारांनी राज्यात रोवला. महिलांच्या सबलीकरणासाठी जून १९९४ मध्ये पवारांनी महिला धोरण जाहीर केले. महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी पवारांनी हे उचललेले महत्वाचे पाऊल होते. महाराष्ट्राच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे होते.

१९९५ – विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव, विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी पवारांवर अनेक आरोप केले. राजकारणाच्या गुन्हेगारीवरून लक्ष्य केले, विरोधकांनी आरोप करूनही पवारानी संयम सोडला नाही. काही चुकीचे केलेले नसल्याने विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचे टाळले, त्याचा काही प्रमाणात फटका पवारांना बसला. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले.


१९९५-९६ – सत्ता गमाविल्यावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते. १९९६ – पुन्हा राष्ट्रीय राजकारणात. लोकसभेवर निवड.


१९९८ – लोकसभेवर पुन्हा निवडून आले. तेव्हा राज्यात युतीची सत्ता असतानाही कॉंग्रेस व सर्व रिपब्लिकन आघाडीचे ३८ खासदार निवडून आले होते, यात पवारांची भूमिका महत्त्वाची होती. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. पवारांच्या धूर्त चालीमुळेच लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात वाजपेयी सरकारचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता.


१९९९ – राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोपविण्यात आल्याने पक्षात काही प्रमाणात अस्वस्थता होती. तेव्हा सोनियांच्या विदेशीचा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला. साहजिकच कॉंग्रेसमध्ये प्रतिक्रिया उमटली. विदेशी वंशाच्या नेत्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपविणे कितपत योग्य, असा सवाल पवारांनी केला होता, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत यावर खल होण्यापूर्वीच पवारांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. पूर्णो संगमा आणि तारिक अन्वर या पक्षाच्या दोन नेत्यांनी पवारांना साथ दिली. काँग्रेसमधून बाहेर पडताच पवारांनी १० जून १९९९ रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेनंतर चार महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५८ आमदार निवडून आले होते. राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तेव्हा पवारांनी शिवसेना-भाजपला पाठिबा द्यावा, असा प्रस्ताव होता.

सोनियाच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित करीत पवारांनी काँग्रेसला रामराम ठोकला असला, तरी विचारसरणीशी समझोता केला नाही, निधर्मवादी शक्तींबरोबर राहण्याच्या धोरणानुसार काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केले. सोनियांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित केला त्याच काँग्रेसबरोबर पवारांनी हातमिळवणी केली.

२००१-०४- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष
भूकंपाच्या पुनर्वसनाचा अनुभव असलेल्या पवारांकडे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भूजच्या भूकंपानंतर आपत्तीला तौड देण्यासाठी धोरण तयार करण्याच्या उद्देशानेच महत्त्वाची जबाबदारी सोपविली. १९९८ मध्ये पवारांच्या डावपेचामुळे वाजपेयी सरकार एक मताने पडले होते. त्याच वाजपेयी यांनी पवारांकडे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची जबाबदारी सोपविली. सध्या देशात कुठेही आपत्ती झाल्यास मदतीसाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले जाते. अशा पद्धतीची स्वतंत्र यंत्रणा असावी ही मूळ शिफारस पवारांनी केली होती व सरकारने ती प्रत्यक्षात आणली.

२००४ – सोनियांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित करूनही पवारांनी महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केले. सारे मतभेद विसरून पवारांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली. तेव्हा सोनिया गांधी या खास पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीकडे पुरेसे संख्याबळ झाले. यूपीए-१ सरकारमध्ये शरद पवार यांच्याकडे कृषी, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा ही महत्त्वाची खाती होती.

पवारांनी कृषी खात्याचे मंत्रिपद स्वीकारले त्या पहिल्याच दिवशी त्यांच्याकडे धान्य आयातीची फाइल आली होती. पण शेती क्षेत्रात पवारांनी महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. देशातील अन्नधान्याची कोठारे भरली. शेतकऱ्यांच्या हाती जादा पैसे आले. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल पवारांनी घडवून आणले. २००९ – लोकसभा निवडणुकीत यूपीएला पुन्हा सत्ता मिळाली.
पवारांकडे पुन्हा तीच खाती सोपविण्यात आली. २००४ ते २०१४ या दहा वर्षात कृषी खाते भूषविताना पवारांनी देशाच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र असे बदल घडवून आणले. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.


२०१४ : १९६७ पासून सातत्याने लोकांमधून निवडून येणाऱ्या पवारांनी लोकांमधून निवडून जाण्याऐवजी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय


२०२० – राज्यसभेवर फेरनिवड.


सन्मान

  • पद्मविभूषण – २०१७
  • उत्कृष्ट संसदपटू – २००७

संस्थात्मक कार्य

  • अध्यक्ष, नेहरू सेंटर, मुंबई
  • अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा
  • अध्यक्ष, विद्या प्रतिष्ठान, बारामती व पुणे
  • अध्यक्ष, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती
  • अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
    •अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
  • अध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई

विविध पुरस्कार

  • अमेरिकेतील मिशिगन येथील दी लॉरेन्स
    टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ऑफ साउथफिल्डकडून
    ऑननरी डॉक्टरेट इन ह्युमॅनिटी
  • पुण्यातील टिळक विद्यापीठाचे डी. लिट.
    भुवनेश्वरच्या ओडिशा युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर
  • आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर
    ऑफ सायन्स
  • पुण्यातील डी. वाय. विद्यापीठाकडून डी. लिट.
  • औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ
    हेल्थ सायसेन्सकडून डॉक्टर ऑफ सायन्स
  • राजर्षी शाहू पुरस्कार
  • लोकमान्य सन्मान पुरस्कार

अध्यक्षपदे भूषविलेल्या संस्था

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
  • बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया (बीसीसीआय)
  • मुंबई क्रिकेट असोसिएशन
  • राज्य कबड्डी संघटना
  • राज्य कुस्तीगीर परिषद
  • राज्य ऑलिम्पिक संघटना
  • राज्य खो-खो संघटना
    (टीप – ही माहिती संक्षिप्त आणि ठळक स्वरूपात आहे. त्यामुळे अनेक मुद्यांचा उल्लेख केलेला नाही )
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »