डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांना बळीराजा कृषी पुरस्कार
मुंबई : ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य, ऊस शेतीबाबत महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे आणि प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांना मराठी विज्ञान परिषदेचा ‘बळीराजा – अण्णासाहेब शिंदे’ कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी मुंबईत होत आहे.
यासंदर्भात मराठी विज्ञान परिषदेने डॉ. जमदग्नी यांना पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे. पत्रात म्हटले आहे की, मराठी विज्ञान परिषदेतर्फे कृषीक्षेत्रात नावीन्यपूर्ण व उपयुक्त काम करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेला बळीराजा – अण्णासाहेब शिंदे कृषि पुरस्कार तीन वर्षातून एकदा दिला जातो.
या वर्षी या पुरस्कारासाठी एक संस्था व पाच व्यक्ती यांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून डॉ. चंद्रकांत साळुंखे, डॉ. विवेक पाटकर आणि श्री. अ. पां. देशपांडे यांच्या परीक्षक समितीने मूल्यमापन करून आपली निवड बळीराजा अण्णासाहेब शिंदे कृषी पुरस्कारासाठी केली आहे. त्याबददल आपले अभिनंदन!!
ह्या पुरस्काराचे स्वरूप रू. १०,००० व सन्मानपत्र या स्वरूपाचे असून पुरस्कार वितरण परिषदेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात होईल. हा कार्यक्रम परिषदेच्या विज्ञान भवनात रविवार दि. २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते १.३० या वेळात होईल. प्रा. सुहास पेडणेकर (निवृत कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
डॉ. जमदग्नी यांचे डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. सुरेशराव पवार, डॉ. रामचंद्र साबळे यांनी अभिनंदन केले.