साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सूत्रे स्वीकारली
पुणे : नवे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारपासून कामकाजास सुरुवात केली. ते २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, आतापर्यंतचे सर्वात तरुण साखर आयुक्त ठरले आहेत.
डॉ. खेमनार यांनी साखर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची सकाळी दहा वाजता आढावा बैठक घेतली. दुपारी दोन वाजेपर्यंत बैठक चालली.
साखर उद्योगाचे प्रलंबित विषय, कायदेशीर बाबी, साखर आयुक्तालय आणि राज्य शासनाकडे असलेले प्रलंबित विषय आदींचा आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
ज्येष्ठ सनदी अधिकारी अनिल कवडे ३१ मार्च रोजी साखर आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर, डॉ. खेमनार यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. कवडे यांच्या निरोप समारंभासाठी ते थोडा वेळ साखर आयुक्तालयात आले होते, पदभारही स्वीकारला होता; मात्र कामकाजास सुरुवात केली नव्हती. या दृष्टीने डॉ. खेमनार यांचा सोमवार हा कामकाजाचा पहिला दिवस ठरला.
साखर उद्योग आणि ऊस शेतीबाबत त्यांना व्यक्तिश: रस आहे. त्यामुळे ते त्यांचा साखर आयुक्त पदाचा कार्यकाळ निश्चितपणे पूर्ण करतील, अशी आशा आहे.