डॉ. मुळीक यांना थायलंडचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
पुणे : ‘शुगरटुडे’ मॅगेझीनचे प्रमुख मार्गदर्शक, नामवंत कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांना, कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एशियन असोसिएशन फॉर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मे महिन्यात बँकॉक (थायलंड) मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण होईल.
एशियन असोसिएशन फॉर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग (एएएई) आणि थाई सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्स (टीएसएई) यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जाईल. कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या या दोन्ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वतीने २२ ते २४ मे २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग कॉन्फरन्स (आयएईसी-२०२४) आयोजित केली आहे. त्यात २३ मे रोजी डॉ. मुळीक यांचा गौरव करण्यात येईल.
डॉ. मुळीक यांनी कृषी पदव्युत्तर पदवीनंतर अलाहाबाद येथे कृषी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अमेरिकेतील प्रसिद्ध युटाह विद्यापीठातून जलसिंचन विषयात पीएच. डी. पदवी मिळवली आहे. महाराष्ट्रातील पहिले कृषी विज्ञान केंद्र, पहिली द्राक्ष निर्यात आदी अनेक बाबींचे श्रेय डॉ. मुळीक यांना आहे. गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी शेती विकास आणि शेतकरी यांच्या कल्याणासाठी वाहून घेतले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन होण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. आज ८३ व्या वर्षीही ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.