डॉ. राहुल (दादा) कदम

वाढदिवस विशेष
उदगिरी शुगरचे चेअरमन डॉ. राहुल (दादा) कदम यांचा 26 मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त हा विशेष लेख. शुगरटुडे परिवाराच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा.
उदगिरी कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल शिवाजीराव कदम हे शांत, संयमी, जिज्ञासू वृत्तीचे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांचे शिक्षण बी.ई. (कॉम्प्युटर्स), एमबीए (मार्केटींग व एचआर) असून त्यांनी व्यवस्थापनामध्ये पीएचडी मिळविलेली आहे.
डॉ. राहुलदादा यांनी साखर कारखान्या बरोबरच आयटी, फार्मा, ऑटोमोबाईल, हॉर्टिकल्चर तसेच बांधकाम क्षेत्रामध्येही कार्यरत आहेत. तरुण वयात त्यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवल्याने ते अल्पावधीत यशस्वी उद्योजक म्हणून परिचित झाले आहेत.
वेस्ट इंडियन शुगर्स असोसिएशनचे संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वीपण काम केलेले आहे. या संस्थेच्या माध्यमातून खाजगी साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत.
उदगिरी कारखान्याचे प्रभावी चेअरमन म्हणून ते काम पहात आहेत. मा. डॉ. शिवाजीराव कदम, मा.मोहनशेठदादा यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल दादा यांनी अल्पावधीत कारखान्याचा नांवलौकीक वाढविलेला आहे.
कारखान्याची उभारणी बामणीच्या ओसाड माळरानावर करण्यात आली. हा तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. कारखाना उभारणी करताना पाण्याची उपलब्धता नव्हती, टँकरने पाणी आणून कारखान्याची उभारणी करण्यात आली.
दैनंदिन 2500 मे.टन ऊसाचे गाळप, 14 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाची विक्रमी म्हणजे केवळ 9 महिन्यामध्ये उभारणी पूर्ण करण्यात येवून यशस्वी चाचणी गळीत हंगाम घेतलेला आहे. तसेच 30 हजार लिटर्स क्षमतेचा आसवणी प्रकल्प डिसेंबर, 2015 पासून कार्यान्वित केलेला आहे.
डॉ. राहुलदादा यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याने आतापर्यन्तचे सर्व गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडले आहेत.
या सर्व हंगामामध्ये शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी प्रमाणे पेमेंट दिलेले आहे. त्याच बरोबर विविध हंगामामध्ये मिळून एकूण 59 कोटी 66 लाख रुपये एफआरपी पेक्षा जादा रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रात जसजसे ऊसाचे उत्पादन वाढले तसतसे कारखान्याची गाळप क्षमता दैनंदिन 2500 मेटनावरुन 4000 मे.टन केलेली आहे, तसेच डिस्टिलरीची क्षमता 30 हजार वरुन 55 हजार लिटर्स केलेली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रात ताकारी व टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे ऊसाखालील क्षेत्राची वाढ झालेली आहे. त्यामुळे गळीत हंगाम 2023-24 पासून कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 5000 मे. टन आणि डिस्टिलरी क्षमताही 1 लाख 50 हजार लिटर्स करण्याचे काम डॉ. राहुलदादा यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेले आहे.
कामकाजातही आधुनिक तंत्रज्ञान
कारखान्याने विविध विभागाचे कामकाजामध्ये सुसूत्रता यावी, कामे बिनचुक व वेळेत व्हावीत याकरिता अत्याधुनिक ईआरपी सिस्टीम बसविलेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाची नोंद प्रत्यक्ष त्यांचे बांधावर जावून सॅटेलाईट प्रणालीद्वारी घेतली जाते. ऊस तोडणी-वाहतुकीची स्लीप डायरेक्ट नंबर ट्रेकींग तसेच वजन काट्यास फिड होते.
त्याचप्रमाणे ऊसाचे वजन झाले की संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईलवर ऊस वजनाचा एसएमस पाठविला जातो. तसेच ऊस वाहतुक करणाऱ्या कंत्राटदारासही ऊसाचे वजन झाले की, ऊसाचे अंतर तसेच त्याचे वाहनामध्ये डिझेल टाकले तर तसा एसएमएस लगेच पाठविण्याची प्रणाली अवलंबिलेली आहे. तसेच कारखाना अधिकारी व कर्मचारी यांचे निवासा करिता सुसज्ज कॉलनीचे काम हाती घेतलेले आहे.
कारखान्यावर 200 केडब्ल्यु क्षमतेचा रुफटॉप सोलर प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे.
कारखाना स्थळावर, नारळ, आंबा, चिक्कु, पेरु इ. फळझाडांच्या बागा लावलेल्या असून अनेक प्रकारची देशी वृक्षांचीही लागवड केलेली आहे.
तसेच कारखाना परिसर शोभिवंत दिसावा या करिता विविध प्रकारची फुल झाडे व शोभेची झाडे अशा सुमारे 8500 वृक्षांची लागवड केलेली आहे. दरवर्षी 15 जून या मा. डॉ. शिवाजीराव कदम व मा. मोहनशेठ दादा यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे. त्यामुळे कारखाना परिसर हा हिरवाईने नटलेला आहे.
विविध पुरस्कार
डॉ.राहुलदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या झालेल्या प्रगतीचा विचार करून कारखान्यास राज्य तसेच देश पातळीवरील विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे अल्पावधीत आदर्श कारखाना म्हणून कारखान्याचा नावलौकीक झालेला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट या नामांकित संस्थेने कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार तसेच उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचे दोन पुरस्कार प्रदान केलेले आहेत. तसेच पर्यावरणपूरक हरित ऊर्जा निर्मिती करिता “इंडिया ग्रीन एनर्जी” हा देश पातळीवरील पुरस्कारही कारखान्यास मिळालेला आहे.
सीएसआर फंडातून अनेक सामाजिक कामे
कदम कुटूंबियांची नाळ ही समाजाशी जोडलेली आहे, समाजाच्या विकासासाठी सतत कांहीतर करण्याची तळमळ असते. डॉ. शिवाजीराव कदम सर आणि डॉ. राहुलदादा यांनी उदगिरी कारखान्याच्या माध्यमातून सीएसआर फंडातून विविध शैक्षणिक व सामाजीक संस्थांना आज अखेर एकूण 90 लाख रुपयाचा निधी वाटप केलेला आहे.
कारखान्याने ऑक्सीजनयुक्त ॲम्ब्युलन्स, विविध शाळांना संगणक संच, प्रोजेक्टर, खेळण्याचे साहित्य, सायन्स लॅब, विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजना करिता टेबल, शाळेची दुरुस्ती करणे, रंग रंगोटी करणे, कंपाऊंड बांधणे, विद्यार्थ्यांचे शौचालयाची व्यवस्था तसेच माई सिंधूताई सपकाळ यांचे सन्मती बाल निकेतन या आश्रमा करिता तसेच पुणे येथील ऐश्वर्या फौंडेशन यांचे महिला सबली करणे, युवा फिनिक्स सोसायटी संयुक्त वंदेमातरम संघटनेने घेतलेल्या 52 दत्तक मुलांचे शैक्षणिक खर्चा करिता व सुर्योदय सोशल फौंडेशन यांचे वस्तीगृह बांधणे आणि व्ही-केअर फौंडेशन, सातारा यांचे मोकाट जनावरांचे आरोग्य, अन्न व निवारा इ. सुविधांकरिता सीएसआर निधी वाटप केलेले आहे.

साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन बरोबरच आयटी, बांधकाम अशा विविध उद्योग यशस्वीपण चालवून यशस्वी उद्योजक म्हणून नांवलौकीक कमावलेल्या डॉ.राहुलदादा कदम यांना वाढदिवसा निमित्त कोटी-कोटी शुभेच्छा !!
उत्तम पाटील, पूर्णवेळ संचालक, उदगिरी शुगर