डॉ. राहुल कदम यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार जाहीर
पुणे : साखर उद्योग क्षेत्र आणि सामाजिक कार्यात भरीव योगदान देणारे उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक – पत्रकार संघटनेच्या (DMEJ) रविवार दिनांक २९ जानेवारीच्या महाअधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध सिद्धगिरी कणेरी मठाच्या सभागृहात हा महासोहळा होत आहे.
डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे हे दुसरे अधिवेशन आहे. या निमित्ताने महाराष्ट्र महागौरव व डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार २०२४ चे वितरण केले जाणार आहे.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांनी विक्रमी नऊ महिन्यांमध्ये उभा केलेला उदगिरी शुगर अँड पॉवर लि. हा महाराष्ट्रातील आघाडीच्या साखर कारखान्यांपैकी असून, जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रदूषण पातळी कमी ठेवण्याचा आणि कार्यक्षमता वाढवण्याचा विक्रमही या कारखान्याच्या नावे आहे.
डॉ. राहुल कदम यांच्या नेतृत्वखाली हा कारखाना अनेक विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यामुळे कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘सीएसआर’च्या माध्यमातून साखर उद्योग क्षेत्रात सर्वाधिक ‘चॅरिटी वर्क’ करण्याचा मानही याच साखर कारखान्याकडे जातो.
आता महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक – पत्रकार संघटनेच्या या गौरवामुळे डॉ. कदम आणि कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पुरस्काराची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नुकतीच केली.
या महागौरव सोहळ्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार श्रीनिवास पाटील, आयुष्यमान भारत-मिशन महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेटे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
अभिनेते गिरीश कुलकर्णी यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.