नऊ महिन्यात उभारला माळरानावर साखर कारखाना

आवडल्यास ही बातमी शेअर करा

विमानाने आणले स्पेअर, प्रसंगी घर ठेवले तारण:

डॉ. शिवाजीराव कदम यांची विशेष मुलाखत
१५ जून रोजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने

शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारे, तसेच जीवनाच्या प्रत्येक छटेला अधिक रंगतदार, अभिरूची संपन्न बनवणारे, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पुण्यात फार्मसीची मुहूर्तमेढ रोवणारे, विद्यापीठात फार्मसी फॅकल्टी सुरू करणारे, शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे भारती विद्यापीठाचे कुलपती ……. आणि साखर कारखानदारीतही नवे विक्रम प्रस्थापित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शिवाजीराव कदम सर….
त्यांचा १५ जून रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांची ही खास मुलाखत. जाणून घेऊ या शिक्षणतज्ज्ञ, साहित्यप्रेमी, साखर कारखानदार अशा त्यांच्या विविध रंगी छटा….

Udagiri Sugar
उदगिरी शुगरच्या भूमिपूजनावेळी

प्रश्न : निस्सीम शिक्षण प्रेमी ते साखर कारखानदार असा आपला अत्यंत उत्कंष्ठावर्धक जीवनप्रवास आहे. तो जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल. आम्हाला वाटतं आपण शिक्षणापासूनच सुरुवात करावी.
उत्तर : अनेकांना माहिती नसेल की आम्ही भावंडांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले? त्यामुळे हे सांगणे आवश्यक आहे. आमचे गाव कडेगाव तालुक्यातील छोटेशे सोनसळ. आमची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची. आम्ही तिघेही भाऊ म्हणजे मोहनदादा (आमदार मोहनराव कदम), साहेब (दिवंगत डॉ. पतंगराव कदम) आणि माझे चौथीपर्यंतचे शिक्षण गावच्या शाळेत झाले.
पुढच्या शिक्षणासाठी रोज ती-चार कि. मी. चालत शेजारच्या शिरसगावला जावे लागत असे. कारण , आमच्या गावात पुढील शिक्षणाची कसलीही सोय नव्हती.
साहेबांना (पंतगराव कदम) टेक्निकल शिक्षण द्यावे या हेतूने मी रयत शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर येथील शाळेमध्ये आठवीत प्रवेश घेतला. तिथे अकरावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे सायन्स कॉलेज कऱ्हाड येथे बी. एस्सी. ला प्रवेश घेतला.

‘कमवा व शिका’ योजनेत गवंड्याच्या हाताखाली काम
प्रश्न : आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्च भागवताना काय अडचणी आल्या?
उत्तर : शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या, त्यावर आम्ही मात करत गेलो. मी सुरुवातीपासून ‘कमवा व शिका’ या योजनेत काम करत शिक्षण घेत गेलो. त्यामुळे श्रमाचे महत्व शालेय जीवनापासूनच मनावर बिंबत गेले. रयतमध्ये शिकत असताना गवंड्याच्या हाताखाली काम केले.

प्रश्न : कऱ्हाड ते पुणे हा प्रवासाबद्दल काय सांगाल?
उत्तर : सायन्स कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, पुढील शिक्षणासाठी थेट पुणे गाठले. पदव्युत्तर पदवीसाठी विद्यापीठात प्रवेश घेतला आणि मास्टर ऑफ सायन्स पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांतच पीएच. डी. साठी नोंदणी केली.

प्रश्न : पीएच. डी. ला आपले गाईड कोण होते आणि तेव्हाच्या काय आठवणी आहेत?
उत्तर : माझे गाईड होते डॉ. बाळासाहेब कुलकर्णी. पीएच. डी. मागेही मोठे कारण आहे. पतंगरावांनी सूचना केली की, आपण दोघेही ग्रामीण भागातून आलो आहोत. पोस्ट ग्रॅड्यूएट झालो म्हणून शिक्षण थांबायला नको. आपण दोघेही पीएच. डी. करू या. मग आम्ही दोघांनीही एकदाच पुणे विद्यापीठात पीएच. डी. साठी नोंदणी केली. पतंगरावांनी मॅनेजमेंटमध्ये आणि मी रसायनशास्त्र विषयामध्ये. डॉ. बाळासाहेब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली माझे पीएच. डी. तीन वर्षात पूर्ण झाले, तोपर्यंत पतंगरावांनी भारती विद्यापीठाची पायाभरणी सुरू केली होती. मी भारती विद्यापीठाचा पहिला पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून रूजू झालो. तसेच उच्च शिक्षण विभागाचा मी पहिला प्राध्यापक आणि प्राचार्य बनलो.

प्रश्न : पुण्यात फार्मसीचे शिक्षण सुरू करण्याचा मान आपला. पूना कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना कशी झाली?
उत्तर : श्री. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ संस्था फुलू लागली होती. माझे पीएच. डी. १९८२ साली पूर्ण झाले आणि तीनच वर्षात डायरेक्टरेट ऑफ टेक्निकिल एज्युकेशने आणि पुणे विद्यापीठाने मला प्राचार्य म्हणून मान्यता दिली आणि बाल्ह्यावस्थेत असलेल्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीची जबाबदारी स्वीकारली आणि तेथून फार्मसीचा प्रवास सुरू झाला. तब्बल २७ वर्षे मी या कॉलेजचा प्राचार्य होतो.

त्यावेळी भारती विद्यापीठ संस्थेवर दोन सहसचिव नेमले होते. तिसरा सहसचिव म्हणून माझ्यावरही जबाबदारी साहेबांनी सोपवली. तसेच नंतर त्यांनी मला बिल्डिंग कमिटीचा चेअरमन म्हणून नेमले आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ वर्षांत भारतीचे सर्व कॅम्पस निर्माण केले. त्यामागे दूरदृष्टी होती, त्यामुळे आपल्या लक्षात येईल की भारती विद्यापीठाच्या इमारती आजच्या काळातही आधुनिकच आहेत.

प्रश्न : पुणे विद्यापीठाचा अनुभव कसा राहिला?
उत्तर : विद्यापीठाचा अनुभव दोन्ही प्रकारचा, शिक्षण घेताना आणि तिथेच शिकवताना खूप चांगला राहिला. शिवाय विद्यापीठाच्या जडणघडणीतही योगदान देता आले. मी १९८८ साली पहिल्यांदा व्यवस्थापन परिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळी माजी खासदार उत्तमराव पवार, रामकृष्ण मोरे, राधाकृष्ण विखे, भूषण पटवर्धनही निवडणूक रिंगणात होते.

पहिल्यांदा निवडणूक लढवूनही मी प्रचंड बहुमताने निवडून आलो. तेव्हापासून २००६ पर्यंत विद्यापीठाच्या सर्व समित्यांवर मी काम केले आणि या काळात होतकरू, गरजू विद्यार्थी आणि संस्थांना भरीव मदत करता आली याचे मला मोठे समाधान आहे.
विद्यापीठात फार्मसी फॅकल्टीची स्थापना करता आली आणि त्याचा डीन म्हणून मी बारा वर्षे काम पाहिले.

प्रश्न : देशपातळीवर काम करतानाचा अनुभव कसा राहिला?
उत्तर : केंद्र सरकारने माझी दोनवेळा विद्यापीठी अनुदान आयोगावर (यूजीसी) सदस्य म्हणून नेमणूक केली. या कारकीर्दीतही ग्रामीण भागात उच्च शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी खूप काम केले. याच काळात मी विद्यापीठाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले होते. पुढे फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियावर दहा वर्षे सदस्य म्हणून काम केले आणि ‘नॅक’वरही दोन टर्म काम केले.

या काळात भारती विद्यापीठ युनिव्हरर्सिटीदेखील बहरत गेली. सर्व विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या देशातील निवडक संस्थांमध्ये भारती विद्यापीठाचा समावेश होतो, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. भारती विद्यापीठ ही केवळ संस्था नसून एक परिवार आहे, त्यामुळे येथे गेल्या ५७ वर्षांपासून प्राध्यापक संघटना, विद्यार्थी संघटना असे प्रकार नाहीत.

दुष्काळी भागात उदगिरी शुगरची उभारणी

प्रश्न : शिक्षण क्षेत्रात शिखर गाठले असतानाच, आपण उदगिरी नावाचा चमत्कार करून दाखवला. त्यामागची काय प्रेरणा होती?
उत्तर : साखर कारखान्याची उभारणी करावी, हा विचार सर्वप्रथम माझ्या मनात पेरला तो तत्कालीन साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण आणि सी. जे. सुराणा यांनी. आम्ही जागा शोधायला सुरुवात केली. त्यात अडचणी होत्या, कारण अंतराची अट. आजही सध्याच्या कारखान्याच्या २५ कि. मी. परिघात दुसरा साखर कारखाना काढायला परवानगी नाही.

तीन जागा पाहिल्या, दोन सांगली जिल्ह्याबाहेरच्या होत्या आणि तिसरी खानापूर तालुक्यातील. आपण केलेल्या कामाचा लाभ आपल्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा या उद्देशाने बामणी (पारे) ता. खानापूर येथील जागा अंतिम केली.

प्रश्न : आपण विक्रमी वेळेत म्हणजे, अवघ्या नऊ महिन्यांमध्ये साखर कारखाना उभा केला. म्हणूनच त्याला चमत्कार म्हटले आहे. तर हे घडले कसे?
उत्तर : जागा निश्चित झाल्यानंतर जमीन खरेदीचे काम काही महिन्यांत पूर्ण केले. सगळे लोक ओळखीचे होते, त्यामुळे त्यांना विश्वासात घेण्यात वेळ लागला नाही आणि त्यांनी म्हणेल ती रक्कम चेकने दिली, भूसंपादनाचे काम पूर्ण होताच प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला, उजाड, ओसाड माळरानावर प्रगतीचे नंदनवन फुलवण्याचा संकल्प सोडून…

या भाग दुष्काळी असल्याने संपूर्ण जिरायती. पाण्याची समस्या. त्यावर उपाय शोधला, आता पाईपलाइनसारखी व्यवस्था उभी करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. ते काम समांतर सुरू राहील. कारखाना उभारणीसाठी टँकरने पाणी आणले. पतंगराव साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झाले झाले २०११ मध्ये आणि पहिले गाळप झाले २०१२ मध्ये.

प्रश्न : कारखाना उभा करताना काय काय अडचणी आल्या?
उत्तर : सर्वात महत्त्वाची पाण्याची अडचण होती, ती कशी दूर केली हे मी नमूद केलेच आहे. उदगिरी शुगर अँड पॉवरसाठी शंभर कोटींचे कर्ज काढले होते. एवढी मोठी रक्कम आम्ही पहिल्यांदाच उभी करत होतो. त्यामुळे साहजिकच काही अडचणींना तोंड द्यावे लागतेच.

आमची टीम रात्रंदिवस काम करत होती. मी स्वत:, चिरंजीव डॉ. राहुल, आमचे मोठे बंधू मोहनदादा कामाच्या प्रगतीवर बारकाईने नजर ठेवून होतो. सगळी काही मनासारखे, नियोजनानुसार पुढे जात होते. २०१२ ला म्हणजे अवघ्या नऊ महिन्यांत गाळप सुरू होणार, या भावनेने आम्ही हरखून गेलो होतो.

मात्र मध्येच एक अडचण आली. इटलीहून मिलची गिअर असेंब्ली येणार होती, तिला दोन-तीन महिने विलंब लागणार, असे लक्षात आले. कारण ती समुद्रमागे बोटीने येणार होती. बोटीने आणण्याचा उद्देश खर्च कमी करणे हा होता. मात्र ठरल्यानुसार गळीत हंगाम सुरू झाला नाही, तर वाहतूक खर्चाच्या कित्येक पटीने अधिक नुकसान होणार होते.

त्यामुळे डोके लावले आणि विमानाने गिअर असेंब्ली आणण्याची योजना आखली. त्यासाठी तब्बल तीन कोटींचा खर्च येणार होता. ही रक्कम नियोजित खर्चाच्या बाहेरची होती. ती कशी उभी करायची? शेवटी माझा पुण्यातला राहता बंगला तारण ठेवून कर्ज काढले आणि गिअर असेंब्ली विमानाने आणली. त्याला पर्याय नव्हता, अन्यथा हकनाक शंभर कोटींचे व्याज दोन वर्षे भरावे लागले असते.

गिअर असेंब्ली बसवली आणि गळीत चाचणी घेतली. ती अपेक्षेपलीकडे यशस्वी झाली. आम्हा साऱ्यांचा आनंद दुणावला. पहिल्याच गळीत हंगामात सुमारे सव्वा लाख टन गाळप झाले. तेथून कारखान्याने नवनवीन यशशिखरे पादाक्रांत करण्यासाठी झेप घेतली. अडीच हजार गाळप मर्यादा वाढवून चार हजार मे. टन प्रति दिन झाली. डिस्टिलरी सुरू केली. तिची क्षमता वाढवली. को-जन प्रकल्पही सुरू झाला.

उदगिरी उभा करून आमचे चिरंजीव डॉ. राहुल कदम यांच्याकडे सोपवून टाकला. त्यांनी तो गेल्या दहा वर्षांत नव्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. दरवर्षी कारखान्याला गुणवत्तेचे पुरस्कार मिळत आहेत. राज्य, राष्ट्र पातळीवरील पुरस्कारांनी कारखान्याचा सन्मान होत आहे. आम्ही पर्यावरणाची अतीव काळजी घेत आहोत. कारखाना आवारात गेल्यावर तुम्हाला एखाद्या वनबागेत गेल्यासारखे वाटेल. अलीकडेच ‘आरपीसी’ तंत्रज्ञान वापरून प्रदूषणाचा स्तर खूप खाली आणला आहे. हे तंत्रज्ञान वापरणारा उदगिरी शुगर आशिया खंडातील पहिला कारखाना ठरला आहे.

एफआरपी देण्यातही आम्ही आघाडीवर आहोत. गेल्या तीन वर्षांमध्ये आम्ही एफआरपीपेक्षा ४९ कोटी रुपये शेतकऱ्यांना जादा दिले.

प्रश्न : साखर कारखानदारीसमोर भविष्यात काय आव्हाने आहेत?
उत्तर : अनेक आव्हाने उभी ठाकणार आहेत. मात्र सर्वात मूलभूत आणि कळीचा प्रश्न आहे तो ऊस उबलब्धतेचा. याबाबत साखर क्षेत्रातील सर्व जाणकारांनी एकत्र बसून विचार करायला हवा.


खासदारकी लढवण्याची ‘ऑफर’
मला गेल्या वेळी २०१९ मध्ये सांगलीतून खासदारकीची निवडणूक लढवण्याची ‘ऑफर’ होती. काही पक्षांचे प्रस्ताव होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी तर खूपच गळ घातली होती. मात्र ऐनवेळी निवडणूक लढवणे योग न वाटल्याने मी सर्वांना नम्र नकार दिला. निवडणूक अशी अचानक लढवायची नसते. त्यासाठी तयारी असायला हवी.
पुन्हा अशा प्रकारची ‘ऑफर’ आली तर त्याचा विचार करू, एकदा निवडणूकदेखील आजमावून बघू. संधी आलीच तर सोडायला नको, अशी मी मनाची तयारी करत आहे. पाहू या पुढे काय होते? आयुष्यात आव्हाने स्वीकारायची सवय लागलेली आहेच.

उसाची पळवापळवी होणार
नुकताच संपलेला गळीत हंगाम कमी दिवसांचा होता, त्यामुळे पुढील ऊस गळीत हंगाम नेमका कसा राहील याबाबत साखर उद्योग क्षेत्रात शंका आहे. कारण अनेक साखर कारखान्यांच्या क्षमता वाढल्या आहेत. ते त्यांचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे छोट्या साखर कारखान्यांच्या मनात धास्ती आहे. उसाची मोठ्या प्रमाणावर पळवापळवी होऊ शकेल, असा माझा अंदाज आहे.

पत्नीने सहकार्य केल्यामुळेच….
संस्था उभारणीसाठी मी स्वत:ला झोकून दिले, पूर्णपणे वाहून घेतले. भारती विद्यापीठ माझी जणू माताच बनली. त्यामुळे मला कुटुंबाला फारसा वेळ देता आला नाही. ती संपूर्ण जबाबदारी माझ्या पत्नीने स्वीकारली आणि यशस्वीपणे पेलली. पत्नीच्या सहकार्यामुळेच मला माझ्या मिशनसाठी पूर्णवेळ देता आला. त्याचे सारे श्रेय माझ्या पत्नीलाच आहे, हे प्रांजळपणे कबूल करायलाच हवे. त्यांनी संपूर्ण कुटुंब सांभाळले, मुलांना मोठे केले. आमच्या कदम परिवारातील सर्व मुले मात्र शिक्षणासाठी माझ्याकडेच होती. त्यांच्या शिक्षणाकडे माझे लक्ष असायचे.

शिका, कष्ट करा…
कोणतेही युग असो, श्रमाला पर्याय नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. श्रमासोबतच शिक्षणदेखील खूप महत्त्वाचे आहे. शिक्षणाला पर्याय नाही. त्यामुळे शिका, श्रम करा आणि मोठे व्हा. मोठे झाल्यानंतर समाजाला काही तरी देण्याचा प्रयत्न करा, हाच माझा तरुण पिढीला संदेश राहील.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »