साखर उद्योग, शिक्षण क्षेत्रातील द्रष्टे नेतृत्त्व

आवडल्यास ही बातमी शेअर करा
Dr.Budhajirao Mulik

विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांचा १५ जून रोजी वाढदिवस… त्यानिमित्त त्यांचे सुहृद, नामवंत कृषितज्ज्ञ, एशियन असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्सचे फाउंडेशन फेलो, कृषिरत्न आणि कृषिभूषण या महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च कृषी पुरस्कारांनी सन्मानित डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी, डॉ. कदम यांना दिलेल्या शब्दरूपी शुभेच्छा…..

आमचे परममित्र प्रो. डॉ. शिवाजीराव कदम म्हणजे अनेक गुणांचा मेळाच… त्यांचा कामसू स्वभाव आणि विलक्षण बुद्धी यांच्या सुंदर संगमातून अनेक यशोशिखरे उभारली गेली आहेत. त्यांच्याबद्दल लिहिणे म्हणजे मोठे आव्हानच… कारण त्यांचा वावर सर्वच क्षेत्रात लीलया झालेला आहे.

शिक्षण क्षेत्रात ते दीपस्तंभ आहेतच, शिवाय साहित्य असो, समाजकारण असो, उद्योग असो की राजकारण सगळीकडे ते योगदान देतात. साहित्यिक क्षेत्रातील विविध संस्थांवर ते काम करतात, तसेच उद्योजकीय संस्थांसाठीही योगदान देत असतात. शिक्षण क्षेत्रात आभाळाएवढे काम करताना, त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले आणि तेथेही आदर्श निर्माण केले आहेत.

ते आमच्यापेक्षा वयाने लहान असले, तरी आमच्या सर्व सुख-दु:खातले ते मैत्र. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील यशोशिखरांची उंची मोजण्यात जाणकार लोक मग्न असतानाच, उदगिरी शुगर अँड लि. च्या माध्यमातून त्यांनी साखर उद्योग क्षेत्रात २००९ साली पाऊल ठेवले आणि तेथेही आदर्श यशोशिखर उभे केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गतिमान कार्यवाही आणि शेतकरीभिमुख धोरण या त्रिसूत्रीच्या जोरावर डॉ. शिवाजीराव यांनी अवघ्या नऊ महिन्यांमध्ये अडीच हजार टनी साखर कारखाना उभा केला आणि अल्प काळात साखर उद्योग उभा करण्यामध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला.

उदगिरीची शुगरची कथा खऱ्या अर्थाने प्रेरक आहे. अनेक अडथळ्यांना पार करून बामणी (पारे) येथे साखर उद्योगाची आदर्श वास्तू उभी राहिली. सुमारे दीड तपापूर्वीची ही गोष्ट…. डॉ. शिवाजीराव यांनी साखर उद्योग क्षेत्रात उतरायचे ठरवल्यानंतर ते जागा शोधत होते. बरीच शोधाशोध झाल्यानंतर त्यांनी बामणी (पारे) येथील जागा पसंत केली. बामणी (पारे) म्हणजे खानापूर तालुक्यातील कायम दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव… सांगली जिल्ह्याच्या या पट्ट्यात पाण्याचे मोठेच दुभिक्ष्य! त्यात बामणी (पारे) ची जी जागा शिवाजीराव यांनी निवडली तो भाग म्हणजे उजाड, ओसाड परिसर… ग्रामीण भाषेत सांगायचे तर उघडा, बोडका माळ म्हणा.
डॉ. शिवाजीरावांना लोकांनी वेड्यातच काढलं.

Dr. Shivajirao Kadam receiving award
साखरमहर्षी पुरस्कार स्वीकारताना डॉ. शिवाजीराव कदम

या भागात तुम्ही साखर कारखाना काढायचं म्हणता, म्हणजे तुम्हाला खरंच वेड लागलं असावं, अशी टीका झाली. मात्र आमचे शिवाजीराव दूरदृष्टीचे होते. जवळ दुसरा साखर कारखाना नव्हता. स्थानिक लोकांच्या मेहनतीवर आणि स्वत:च्या दूरदृष्टीवर त्यांचा विश्वास होता. हा भाग तत्कालीन आमदार आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व. पंतगराव कदम यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे डॉ. शिवाजीरावांना या भागातील लोक ओळखायचे आणि त्यांच्याही परिचयाचे हजारो लोक होते. अनोळखी भागात जाऊन साखर कारखाना काढण्यापेक्षा आपल्याच लोकांसाठी कारखाना काढू असा संकल्प त्यांनी सोडला आणि कामाला सुरुवात केली.

टँकरने पाणी आणून कारखाना उभा केला, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. फाउंडेशन झाल्यानंतर अवघ्या नवव्या महिन्यात चाचणी गाळप घेतला आणि २०१० सालापासून कारखाना नियमितपणे सुरू झाला. अडीच हजार टन प्रति दिन गाळप क्षमता असलेला उदगिरी शुगर आता पाच हजार टनी झाला आहे आणि कारखान्याची साठ हजार लिटर क्षमतेची डिस्टिलरी आता दीड लाख लिटर क्षमतेपर्यंत गेली आहे.
पुढे कृष्णा खोऱ्याचे पाणी आले आणि पाण्याची कसर भरून निघाली. १५ वर्षांपूर्वी उजाड असणारा बामणी (पारे)चा हा परिसर आता सुजलाम्‌ – सुफलाम्‌ झालाय.

उदगिरी शुगरमुळे या परिसराचा विकास झाला. जेथे रानगवतही उगवणे मुश्किल होते, तो परिसर आता हिरवाईने नटला आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळाला, तर शेतकऱ्यांना हक्काचा साखर कारखाना मिळाला. बामणी (पारे) मध्ये झालेल्या या परिवर्तनाचे श्रेय डॉ. शिवाजीरावांनाच जाते. त्यांच्या निर्णय क्षमतेचा फायदा कारखाना उभारणीत अनेकदा झाला. उभारणीची लगबग सुरू असताना मिलचे गिअरबॉक्स मिळण्यात विलंब होणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सुरू गळीत हंगाम हातातून जाणार होता. डॉ. शिवाजीरावांनी हे गिअर बॉक्स समुद्रमार्गे आणण्याऐवजी विमानाने आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना तीन कोटी रुपये जादा मोजावे लागले. त्यासाठी त्यांनी स्वत:चे राहते घर बँकेकडे गहाण ठेवले. त्यांचा निर्णय योग्य ठरला. गिअर बॉक्स वेळेत आल्याने कारखाना नवव्या महिन्यात सुरू झाला आणि पहिला हंगाम घेता आला.

त्यांचे चिरंजीव डॉ. राहुल कदम यांनी २०१४ साली सूत्रे हाती घेतली आणि कारखान्याला आणखी आधुनिक रूप दिले. ते स्वत: इंजिनिअर असल्याने तंत्रस्नेही आहेत आणि त्यामाध्यमातून कारखान्याची कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. अडीच हजार टनी कारखान्यांची पाच हजार टन क्षमता करताना किंवा डिस्टिलरीचा विस्तार करताना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून कारखाना प्रदूषणमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गाळप क्षमता आणि डिस्टिलरी क्षमता विस्तार अशी मोठी कामे डॉ. राहुल यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी काळात पूर्ण करण्यात आले आहेत. आरपीसी अर्थात रोटरी पार्टिकल कलेक्टर हे अमेरिकी तंत्रज्ञान वापरून प्रदूषण पातळी कमी करणारा उदगिरी शुगर हा आशियातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.

शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम देण्यातही उदगिरी शुगर नेहमीच आघाडीवर राहिला आहे. किंबहुना बऱ्याचदा कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ऊस उत्पादकांना खूश ठेवण्याबरोबरच, डॉ. शिवाजीरावांच्या उदगिरी शुगरने सामाजिक उत्तरदायित्वाचे भान कायम राखले आहे. सीएसआर अंतर्गत विविध घटकांना भरीव मदत करणारा हा पहिलाच खासगी साखर कारखाना आहे.

शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान
खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणाऱ्या डॉ. शिवाजीरावांनी लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्यही घडवले, भारती विद्यापीठाच्या माध्यमातून! छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास एखाद्या कादंबरीला शोभणारा आहे.
शिवाजीराव कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सोनसळ या छोट्या गावात झाला, प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेत झाले; मात्र पुढील शिक्षणासाठी त्यांना आठ कि. मी. अंतरावरील शाळेत चालत जावे लागत असे. काही झाले तरी शिक्षण सोडायचे नाही, अशी खूणगाठ त्यांनी लहान वयातच बांधली होती. पुढे ते आणि त्यांचे बंधू पतंगराव कराडच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये दाखल झाले. कमवा आणि शिका योजनेमध्ये काम करत ते शिकत राहिले. पदव्युत्तर शिक्षणासाठी दोन्ही बंधूंनी पुणे गाठले आणि विद्यानगरी असणाऱ्या पुण्यावर दोघांनी आपली अमिट छाप निर्माण केली. विद्यानगरीच्या लौकिकात भर घालणारे भारती विद्यापीठ स्व. पंतगराव कदम यांनी स्थापन केले आणि शिवाजीरावांनी त्यास आकार दिला, विस्तार केला. त्यांच्या दूरदृष्टीतून पुण्यातील भारती विद्यापीठाची इमारत सुमारे ५० वर्षांपूर्वी उभी राहिली, पण ही वास्तू आजच्या आधुनिक काळाशीदेखील सुसंगत आहे. त्यात बदल करण्याची आजतागायत गरज पडलेली नाही.

भारती विद्यापीठ स्थापन करण्यामागे स्व. डॉ. पतंगराव यांचे उदात्त स्वप्न होते आणि ते सत्यात आणण्याचे काम डॉ. शिवाजीरावांनी सर्वस्व झोकून देऊन पूर्ण केले. त्यांना स्व. पतंगराव आणि ज्येष्ठ बंधू मोहनराव दादा यांनी सर्व प्रसंगांत संपूर्ण पाठिंबा दिला. डॉ. शिवाजीराव यांचे एकच ध्येय होते, भारती विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय शैक्षणिक नकाशावर आणणे. त्यासाठी ते प्रचंड राबले. त्यामुळे त्यांना स्वत:ला कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसे. मात्र त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रजनीताई यांनी त्याबाबत कधीही तक्रार केली नाही. त्यांनी केवळ स्वत:ची मुलेच सांभाळली नाही, तर डॉ. शिवाजीरावांच्या सर्व भावांची मुलेही सांभाळली आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. शिवाजीरावांचे सर्व पुतणे पुण्यात शिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्याकडेच राहायला होते. कदम कुटुंब म्हणजे सात भाऊ आणि एक बहीण.

डॉ. कदम यांनी भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये व्याख्याता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली, त्यानंतर त्यांची नव्याने सुरू झालेल्या पूना कॉलेज ऑफ फार्मसी (पुणे) चे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली, जे त्यावेळचे पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील पहिले फार्मसी कॉलेज होते. डॉ. कदम 2006 मध्ये भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू झाले. तोपर्यंत म्हणजे तब्बल 27 वर्षे त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले.
२५ पेटंट
डॉ. शिवाजीराव यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली पूना कॉलेज ऑफ फार्मसीने मोठी प्रगती केली. अल्पावधीतच ते भारतातील अग्रगण्य फार्मसी महाविद्यालय बनले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाऊणशे विद्यार्थ्यांनी पीएच. डी. केली आहे. या महाविद्यालयाला 25 पेटंट मिळाले आहेत. पुणे विद्यापीठातील फार्मसी विभागाचा कायापालट करण्याचे श्रेयदेखील त्यांना दिले जाते, ज्यामुळे महाराष्ट्र राज्यात प्रथमच पुणे विद्यापीठातील फार्मसी फॅकल्टीची स्थापना झाली आणि त्याचे पहिले डीन वा अधिष्ठाता म्हणून शिवाजीरावांची नेमणूक झाली. त्यांना पुढे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचीही ऑफर आली होती, मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला. या घटनेचे आम्ही स्वत: साक्षीदार आहोत.

संशोधनाची खरी आवड आणि जिद्द असलेल्या डॉ. शिवाजीराव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा संशोधनासाठी सदैव प्रोत्साहन दिले. पेटंट हे त्याचेच फलित आहे. या महाविद्यालयाने फार्मसी अर्थात औषधनिर्माण शास्त्राच्या क्षेत्रात अनेक संशोधक दिले आहेत. भारती विद्यापीठ आणि बाहेरच्या विविध संस्थांवर ॲकॅडमिक आणि कार्यकारी पदांवर काम करण्याचा प्रचंड अनुभव शिवाजीरावांच्या गाठीशी आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली दु:खद निधनानंतर, कुलपती पदाची जबाबदारी डॉ. शिवाजीराव यांच्यावर आली आणि त्यालाही त्यांनी त्यांच्या खास पद्धतीने न्याय दिला.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान
डॉ. शिवाजीराव हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध व्यावसायिक आणि सरकारी संस्थांमध्ये सक्रिय सदस्य असून, भरीव योगदान देत आहेत. शासनाच्या अनेक नामवंत आणि प्रभावशाली समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. ते 6 वर्षे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य होते, तर 10 वर्षे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य होते. तेथे काम करताना त्यांनी भारताच्या फार्मसी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणले आहेत. ते नॅशनल ॲक्रेडिटेशन अँड असेसमेंट कौन्सिल (NAAC) च्या गव्हर्निंग कौन्सिलचेही सदस्य होते. UGC आणि NAAC या दोन्हींच्या वित्त समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याशिवाय ते पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद, शैक्षणिक परिषदेचे आणि सिनेट आणि फार्मसी फॅकल्टीचे सदस्य होते. त्यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नातून पुणे विद्यापीठात फार्मसीची स्वतंत्र विद्याशाखा सुरू झाली. ही त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते. ते पुणे विद्यापीठाच्या स्थायी समितीचे सदस्यही होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावरही त्यांनी काम केले आहे. भारतातील उच्च शिक्षणाच्या अनेक नामांकित संस्था, उदा., नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई, कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT), भुवनेश्वर, यांच्या व्यवस्थापन मंडळावर प्रतिनिधी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने नामनिर्देशित केले होते. मध्य प्रदेशात इंदूर येथे त्यांच्या नावाने डॉ. शिवाजीराव कदम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट संस्था सुरू करण्यात आली आहे.

शिक्षण आणि साखर कारखानदारी क्षेत्रातील मानाचे सर्व पुरस्कार डॉ. शिवाजीरावांना मिळालेले आहेत. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१३ साली दिल्लीत झालेल्या बार कौन्सिलच्या कार्यक्रमात त्यांचा विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले होते. तसेच तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्तेही डॉ. शिवाजीरावांना गौरवण्यात आले आहे.

प्रोफेसर डॉ. शिवाजीराव कदम यांचे कार्य आणि कारकीर्द शब्दांमध्ये गोवणे खरं तर अवघड काम आहे. आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा! ईश्वर त्यांना दीर्घायुरोग्य देवो ही प्रार्थना. सौ. रजनीताईंची साथ होती म्हणूनच ते जीवनात अनेक यशोशिखरे पादाक्रांत करू शकले. म्हणून सौ. रजनीताईंचेदेखील मन:पूर्वक अभिनंदन. शिवाजीरावांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, आता केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी आमची इच्छा आहे.

डॉ. शिवाजीरावांचे ज्येष्ठ बंधू माजी आमदार मोहनराव दादा यांचाही वाढदिवस १५ जून रोजीच आहे. हा मोठा योगायोग आहे. त्यांनाही आमच्या मनापासून शुभेच्छा! ईश्वर त्यांना सआरोग्य उदंड आयुष्य देवो!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »