‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवेशनाची जय्यत तयारी

२४, २५ ऑगस्टला रंगणार साखर उद्योगातील मान्यवरांचा महामेळावा, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आदींची उपस्थिती
पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रात १९३६ पासून मार्गदर्शन करणारी नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन (इंडिया) अर्थात डीएसटीएचे बहुप्रतीक्षित वार्षिक अधिवेशन आणि तंत्रज्ञान प्रदर्शन (शुगर एक्स्पो) २४ आणि २५ ऑगस्ट रोजी, पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे.
हे 69 वे वार्षिक अधिवेशन असून, त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अधिवेशन आणि शुगर एक्स्पोच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे महसूल, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तर सन्माननीय पाहुणे म्हणून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची विशेष उपस्थिती राहील.
२४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अधिवशेनाला सुरूवात होईल. यावेळी साखर उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
अधिवशेन आणि शुगर एक्स्पोच्या तयारीची माहिती ‘डीएसटीए’चे अध्यक्ष आणि उद्योगपती एस. बी. भड यांनी दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सोहन शिरगावकर (महाराष्ट्र विभाग), तांत्रिक उपाध्यक्ष एस. डी. बोखारे आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
साखर उद्योग क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल विवेक हेब्बळ (कर्नाटक), दिलीपराव देशमुख, अरुणअण्णा लाड (महाराष्ट्र), प्रकाश नाईकनवरे (दिल्ली), अमृतलाल पटेल (गुजरात) आणि संजय अवस्थी (उत्तर प्रदेश) या मान्यवरांना साखर उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याखेरीज सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ट औद्योगिक कार्यक्षमता या श्रेणींतील पुरस्कारांसोबतच जीवनगौरव पुरस्कारांचे वितरणही पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.
२४ आणि २५ असे दोन्ही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात तांत्रिक सत्रे आणि शोधनिबंध सादरीकरणाचाही समावेश आहे. या जोडीला साखर उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या संस्था आणि कंपन्यांनी ‘शुगर एक्स्पो’मध्ये सहभाग घेतल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवे तंत्रज्ञान पाहण्याची संधी या निमित्ताने ‘डीएसटीए’ने सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. देशभरातील सुमारे दोन हजार प्रतिनिधींची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभण्याची अपेक्षा आहे.
अधिवेशनाचे मुख्य प्रायोजक एस. एस. इंजिनिअर्स, एस. बी. रिशेलर्स, उल्का इंडस्ट्रीज, एल्कॉन इंजिनिअरिंग कंपनी, इसजेक (ISGEC) हेवी इंजिनिअरिंग, प्राज इंडस्ट्रीज या कंपन्यात आहेत.
या अधिवेशनाला साखर उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र विभाग) सोहन शिरगावकर, उपाध्यक्ष (गुजरात विभाग) एम. के. पटेल, उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे, कार्यकारी सचिव गौरी पवार, कार्यकारी मंडळ सदस्य मुकुंद कुलकर्णी, एस. डी. बोरुडे, सी. जी. माने, डॉ. एस. एम. पवार, डॉ. मोहन डोंगरे आदींनी केले आहे.
डीएसटीए बाबत थोडक्यात…
पुण्यात मुख्यालय असलेली डीएसटीए (आय) ही साखर उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि अन्य घटकांचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था आहे. तिची स्थापना प्रसिद्ध उद्योगपती शेठ लालचंद हिराचंद यांनी १९३६ साली केली. संस्थेचे कार्यक्षेत्र देशभर, प्रामख्याने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये असून, सुमारे अडीच हजारांवर सभासद आहेत. गेल्या ६९ वर्षांपासून संस्थेची वार्षिक परिषद न चुकता होत आहे आणि त्याची प्रतीक्षा संपूर्ण साखर उद्योगाला असते.