खोडवा-निडवा व्यवस्थापनावर शनिवारी चर्चासत्र
पुणे : पुढील गाळप हंगामासाठी ऊस कमी पडू नये या उद्देशाने खोडवा-निडवा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, यावर महत्त्वपूर्ण विषयावर ‘डीएसटीए (आय)’ने १६ डिसेंबर २०२३ रोजी एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात येथील ऊसतज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करतील. हे चर्चासत्र केवळ साखर कारखान्यांसाठी आहे.

या वर्षीच्या अवर्षण परिस्थितीत उसाची लागण कमी झाली आहे. त्याचा परिणाम 2024-25 च्या गळीत हंगामावर होणार आहे. या गळीत हंगामात तुटणारा लागणीचा उसाचा खोडवा आणि तुटणारा खोडव्याचां निडवा असे दोन्ही जास्तीत जास्त जोपासले तर काही प्रमाणात उसाचा पुरवठा वाढेल आणि गळीताचे दिवस वाढतील.
खोडवा आणि निडवाचे उत्पादन वाढवण्यसाठी शास्त्रोक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे शास्त्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हेदेखील आवश्यक आहे. याच उद्देशाने DSTAI डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन (इंडिया) या नामवंत संस्थेने एक दिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे. संस्थेच्या शिवाजीनगर (पुणे) येथील सभागृहामध्ये चर्चासत्र होईल, असे ‘डीएसटीए’ने कळवले आहे.
शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.0 ते सायंकाळ 5.0 पर्यंत, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात येथील साखर कारखान्याचे शेती आणि ऊस विकास अधिकारी यांना आमंत्रित केले आहे.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन (इंडिया) चे शास्त्रज्ञ अवर्षण स्थितीत खोडवा निडवाचे शास्त्रोक्त व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करता येईल. तसेच डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन (इंडिया) चे शास्त्रज्ञही कारखान्याच्या मागणीनुसार शेतकरी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यक्षेत्रावर येतील, असा शब्द संस्थेने दिला आहे.
साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे आहेत, तर माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर सन्माननीय अतिथी आहेत. हे मार्गदर्शक चर्चासत्र साखर कारखान्यांसाठी मेजवानीच असून, त्याचा साखर कारखान्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक ‘डीएसटीए’ने केले आहे.
‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष एस. एस. शिरगावकर, एम. के. पटेल, एस. डी. बोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साखर संघ तसेच ‘विस्मा’ च्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र होत आहे.