एमएससी बँक घोटाळा: ‘बारामती ॲग्रो’वर ED चे छापे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक फसवणुकीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या सहा कार्यालयांवर ५ जानेवारी रोजी छापे टाकले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मराठवाड्यातील कन्नड साखर कारखान्यावरही ‘इडी’च्या अधिकाऱ्यांची शोधमोहीम सुरू होती.

एमएससी बँक प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर ‘इडी’ने पहिल्यांदाच बारामती अॅग्रोवर छापे टाकले आहेत.

दरम्यान, ‘शुगरटुडे’ने रोहित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. यापूर्वी पवार आणि राष्ट्रवादी पक्षाने हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आणि भाजप सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणी मुंबई पोलीस आणि ईडी चे अधिकारी ७० हून अधिक राजकारण्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. ज्यात राष्ट्रवादीचे ५०, काँग्रेसचे नऊ, शिवसेनेचे दोन आणि भाजपच्या एका नेत्याचा समावेश आहे.
एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव त्यावेळी आरोपी म्हणून होते, तर त्यांचे काका, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव या प्रकरणात अद्याप आलेले नाही. मात्र त्यांच्या भूमिकेचेही ईडीकडून अप्रत्यक्षपणे चौकशी केली जात आहे.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी स्वत: शरद पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयासमोर मोर्चाने गेले होते. त्यावेळी त्यांच्या चौकशीची आताच गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »