‘ईडी’चे बारामती, पुणे, मुंबई, कर्जतमध्ये छापे
मुंबईः सक्तवसुली संचलनालयाने (ई़डी) मुंबई, कर्जत, बारामती व पुणे येथे छापे टाकले. श्री शिव पार्वती साखर कारखाना लि., हायटेक इंजिनिअरींग कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लि. व त्याच्या संचालकांविरोधात बँक कर्ज फसवणुकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल उपकरणे व १९ लाख ५० हजार रोख जप्त करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन या कंपनीचे नाव आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या प्रकरणातही आले होते.
श्री शिव पार्वती साखर कारखाना लि.चे संचालक व इतर आरोपींविरोधात बेकायदेशीर फायदा मिळवण्यासाठी बनावट खाते, बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला होता. त्याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहेत.
ईडीच्या तपासानुसार, कंपनी मे श्री शिव पार्वती साखर कारखाना लिमिटेडने १०० कोटी रुपयांचे कर्ज बँकांकडून घेतले. कर्जाच्या अटीप्रमाणे आवश्यक प्रकल्पासाठी कर्जातील ७१ कोटी १९ लाख रुपये गुंतवणे अपेक्षित होते, पण तसे करण्यात आलेले नाही.
त्यानंतर कंपनीचे संचालक आणि त्यांची उपकंपन्या मे. तासगावकर कन्स्ट्रक्शन लिमिटेड; मे. तासगावकर इंडस्ट्रीज लि. आणि तिचे सहयोगी मे. हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लि. यांच्याकडे कर्जाची रक्कम वळवण्यात आली. त्यामुळे कंपनीचे नुकसान झाले. त्यातून त्यांना फायदा झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.
बीडच्या धारूर तालुक्यातल्या मुंगी गावच्या पांडुरंग सोळंके यांनी २०१० साली शिवपार्वती सहकारी साखर कारखान्याची उभारणी करायला सुरुवात केली. त्यात त्यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांना सोबत घेऊन एक सामंजस्य करार केला होता. त्यानंतर २०१३ मध्ये याच कारखान्याच्या नावावर तासगावकर कुटुंबीयांनी १०६ कोटी रुपयांचे कर्ज पंजाब नॅशनल बँक आणि इतर दोन बँकांकडून घेतले होते.
पुढे हा कारखाना दिवाळखोरीत निघाला. याप्रकरणी शिवपार्वती साखर कारखान्याचे बनावट दस्तऐवज तयार करून कारखाना स्वतःच्या नावावर घेऊन कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पांडुरंग सोळंके यांनी २०२२ मध्ये बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. तसेच त्यावेळी बँकांनीही लिलाव प्रक्रिया सुरू केली होती.