उसाच्या फडाला लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

अंबाजोगाई : तालुक्यातील ममदापूर शिवारात शनिवारी (१४ मार्च) पहाटे एका शेतातील उसाला लागलेल्या आगीत एका ६० वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विश्वनाथ पांचाळ (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर उसाच्या शेतात ही घटना घडली.
उसाला अचानक आग लागल्यानंतर ती विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना उसाच्या सरीमध्ये जळालेला मृतदेह दिसून आला.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्षित आणि वारकरी संप्रदायातील होते. मात्र, ते गेल्या काही काळापासून आजारी होते. आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





