उसावरून ऊर्जा! जकराया कारखान्याचे पथदर्शी मॉडेल चर्चेत

नाईक-निंबाळकरांचा गौरव – पारदर्शक मॉडेलची प्रशंसा
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी वटवटे येथील जकराया शुगर कारखान्यास भेट देत औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील नव्या उपक्रमांची पाहणी केली. कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या सीबीजी (कंप्रेस्ड बायोगॅस) प्रकल्पाची त्यांनी सखोल माहिती घेतली. हा प्रकल्प देशातील साखर कारखानदारीसमोर पारदर्शक आणि पथदर्शी मॉडेल म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपक्रमांची पाहणी
जकराया शुगरचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या ‘न्यूट्रियन्स’ या फार्म कंपनीचीही त्यांनी पाहणी केली. ग्रामीण भागातील ही राज्यातील पहिली फार्म कंपनी असल्याने तिचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाची माहिती
जकराया शुगरचे तज्ज्ञ संचालक राहुल जाधव यांनी सीबीजी प्रकल्पाची कार्यपद्धती, उत्पादन क्षमता आणि भविष्यातील विस्तार योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
नाईक-निंबाळकर यांचे मत
नाईक-निंबाळकर म्हणाले, “जकराया शुगरने उभारलेला सीबीजी प्रकल्प हा औद्योगिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. देशभरातील साखर कारखान्यांसाठी हा प्रकल्प मार्गदर्शक ठरू शकतो. उसावर आधारित उद्योगांनी अशा पर्यायी ऊर्जास्रोतांकडे वळणे ही काळाची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.”





