५५ कोटींचा अवास्तव खर्च प्रकरणी गडहिंग्लज कारखान्याची चौकशी

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दिले आहेत.
जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ५५ कोटींचा चुकीच्या पद्धतीने विनियोग केल्याची तक्रार कारखान्याचे माजी संचालक, कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे नेते शिवाजी खोत व सभासद आप्पासाहेब लोंढे यांनी केली होती. त्यानुसार तृतीय विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) डी. बी. पाटील यांची नियुक्ती केली आहे.
गडहिंग्लज साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून वेगवेगळ्या कारणांसाठी २०२३ मध्ये २९ अटींना बांधील राहून कर्ज दिले होते. यातून तोडणी वाहतूकसाठी १५ कोटी, पूर्वहंगामी २० कोटी व बिगर हंगाम कर्जापोटी २० कोटी रुपये दिले होते. मात्र, त्यासाठी त्याचा विनियोग योग्य पद्धतीने केला नसल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत चौकशी अहवाल देण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक मावळे यांनी दिले आहेत.
चौकशी मुद्दे :
• जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ५५ कोटी कर्ज २९ अटींना बांधील राहून दिले, त्याविषयी कोणतीच माहिती कारखान्याकडे नाही.
• कर्जे अल्पमुदतीची असताना १६ कोटी ९३ लाख डिस्टीलरी प्रकल्पाच्या ठेकेदाराला दिले. हे नियमबाह्य असून, आवश्यक कागदपत्रे कारखान्याकडे नाहीत.
• बॉयलर रिपेअर्स अॅन्ड मेटनन्स खाली बिदर किसान एस. एस. के. कारखान्यास २ कोटी २४ लाख २० हजार बेकायदेशीर दिले.
• कारखान्याची आर्थिक स्थिती, कर्जे व त्याचा विनियोग अवास्तवपणे रकमेचा विनियोग टेंडर प्रक्रिया न राबवता व संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा न करता केले आहे.
• विनियोगाबाबत आवश्यक त्या लेखापरीक्षात्मक बाबींची पूर्तता उदा. सेवाकर, आयकर, कायदा अंमलबजावणी, बिले पावत्या, कोटेशन मंजुरी योग्य प्रकारे त्याच्या नोंदणीच्या बाबत अनियमितता