सहकारी संस्थांच्या सभांना मुदतवाढ : सहकार आयुक्त

पुणे : राज्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक भागांत सध्या जनजीवन विस्कळित झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची अपरिमित हानी होवून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक गावे पुरग्रस्त परिस्थितीमुळे पाण्याखाली गेली असून, परिसरातील जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. यासर्व बाबींचा विचार करून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या सन २०२४-२५ या कालावधीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी निर्धारीत केलेला कालावधी दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात येत असल्याचा आदेश सोमवारी सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी जारी केला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील सहकारी संस्थांना दिलासा मिळालेला आहे.
वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोणत्याही सहकारी संस्थांनी आपल्या सदस्यांच्या अधिमंडळाची वार्षिक बैठक बोलावणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व सहकारी संस्थांना आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठका या ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आयोजित करणे आवश्यक होते. मात्र, राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे सभा घेण्याच्या जागांवरही पुराचे पाणी आहे. जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावे पुरग्रस्त परिस्थितीमुळे पाण्याखाली गेली असून, परिसरातील जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. या कारणामुळे महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा उपरोक्त कलम ७५ मधील तरतुदीप्रमाणे ३० सप्टेंबर, २०२५ पर्यत आयोजित करणे शक्य होणार नाही. अशा स्थितीत वार्षिक सभा घेण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या होत्या. सहकारी संस्थांकडूनही तशी मागणी येत होती.