कारखाने, धान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धान्यापासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी देणारा आदेश जारी

 पुणे : राज्य शासनाने साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीजना आता मळी आणि उसाच्या रसाबरोबरच धान्यापासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी देणारा शासन आदेश बुधवारी (दि. २३) जारी केल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना त्यांचे डिस्टिलरी प्रकल्प वर्षभर चालवता येणार आहेत, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा राज्यातील मका, भात आणि इतर धान्य उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, या निर्णयाचे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) स्वागत केले आहे.

‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी एका पत्रकाद्वारे याबाबत कळविले आहे की, केंद्र सरकारने २०१८ पासून धान्यापासून इथेनॉलनिर्मितीला परवानगी देऊन महाराष्ट्राशिवाय इतर सर्व राज्यांमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणामध्ये गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये धान्यावर आधारित डिस्टिलरीजची उभारणी होऊन धान्यापासून इथेनॉलनिर्मितीस सुरुवात झालेली होती. मात्र, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना याची परवानगी नव्हती. यासंदर्भात ‘विस्मा’ गेल्या तीन वर्षांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होती.

महाराष्ट्रात मक्यापासून इथेनॉल निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. कोरडवाहू शेतकरी नगदी पीक म्हणून मक्याचे उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळवू शकतील आणि त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळेल. महाराष्ट्रातील साखर कारखाने ही मागणी पूर्ण करण्यास सक्षम असतील, ज्यामुळे परकीय चलन वाचून देश इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकेल. तसेच केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याने इथेनॉलची मागणी भविष्यात वाढणार असल्याचे भाकितही ठोंबरे यांनी या पत्रकात व्यक्त केले आहे.

आर्थिक गणित स्थिरावणार!

या नव्या निर्णयामुळे साखर कारखान्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार, कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी निर्णय दूरगामी सकारात्मक परिणाम करणारा ठरेल. मका, भात व इतर धान्यांनाही मिळणार चांगला भाव मिळणार., रोजगारनिर्मिती वाढण्याबरोबरच कारखान्यांची क्षमताही वापरात येणार., मक्यापासून इथेनॉलनिर्मितीला प्रचंड वाव असल्याने मका नगदी पीक होणार आणि साखर कारखान्यांना आपला डिस्टिलरी प्रकल्प वर्षभर चालविण्याची संधी मिळेल.  

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »