बार्शीत ऊस तोडणीवरून शेतकऱ्यावर हल्ला; गुन्हा दाखल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बार्शी :  शेत जमीन आणि ऊस तोडणीच्या भांडणातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच बार्शी तालुक्यातील आगळगावमध्ये घडली आहे. शशिकांत अर्जुन गुळमीरे (वय ४२) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या शशिकांत गुळमिरे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तक्रारीनुसार पोलिसांनी याप्रकरणी गावातीलच सख्खा भाऊ, पुतण्या आणि भावजयीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धिरज कुमार गुळमीरे, कुमार अर्जुन गुळमीरे, सविता कुमार गुळमीरे, प्रवीण विष्णु गरड (सर्व रा. आगळगाव) व अमर सिध्देश्वर खराडे (रा. कॅन्सर हॉस्पीटल जवळ बार्शी) अशी त्यांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, शशिकांत गुळमीरे आणि त्यांचे भाऊ कुमार गुळमीरे यांच्यात आगळगाव येथील गट नं. ६१३ मधील जमिनीवरून न्यायालयात दिवाणी दावे प्रलंबित आहेत. शशिकांत यांनी आपल्या हिश्श्याच्या जमिनीत ऊस लावला होता. शशिकांत शेतात काम करत असताना प्रविण गरड हा त्यांच्या संमतीशिवाय ऊस तोडत  असल्याचे निदर्शनास आले. शशिकांत यांनी ऊस तोडणीस विरोध केला असता, पाच जणांनी घटनास्थळी जाऊन शशिकांत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

दरम्यान, भांडण विकोपाला गेल्यावर धिरज गुळमीरे याने जवळ असलेला कोयता उचलून शशिकांत यांच्या पाठीवर डाव्या बाजूला गंभीर वार केला. पतीला वाचवण्यासाठी पत्नी मयुरी धावून आली असता, सविता गुळमीरे हिने तिला मारहाण केली. मारहाणीचा पुरावा म्हणून मोबाईलमध्ये फोटो काढत असताना, धिरजने मयुरी यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत तो फोडून टाकला. हल्ल्यानंतर आरोपींनी हे शेत आमचे आहे, पुन्हा येथे दिसलात तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली आणि तोडलेला ऊस बैलगाडीत भरून घेऊन गेले. बार्शी पोलिस अधिक तपास करत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »