ऊसतोडीच्या पैशातून शेतकऱ्याचे अपहरण; रात्रभर डांबले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : वळदगाव परिसरात शेतकरी विलास गोविंद चव्हाण (३५, रा. गिरनेरा तांडा) यांचे अपहरण करून जबरदस्तीने पैसे उकळल्याची गंभीर घटना रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की , विलास चव्हाण मिरची विक्री करून दुचाकीने घरी परतत होते.साम्राज्य हॉटेलजवळ अचिन जयंत चव्हाण, सचिन जयंत चव्हाण (दोघे रा. भासुनाईक तांडा, अंबड, जालना) आणि त्यांच्या सहा साथीदारांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. यावेळी अचानक शिवीगाळ, मारहाण करून जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण करण्यात आले.

आरोपींनी त्यांना भासुनाईक तांडा येथे नेऊन एका खोलीत डांबले. “तुझ्या भावाने पैसे दिले नाहीत, आता तू आमचे पूर्ण पैसे दे” अशी धमकी देत शिवीगाळ व मारहाण केली. आरोपींपैकी एकाने चाकूने उजव्या हातावर वार करून फिर्यादीला जखमी केले. त्यानंतर त्यांना झाल्टा फाटा येथे नेऊन पैशांची मागणी केली.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादीने भावाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर भावाने आरोपींना ₹४०,००० ऑनलाईन पाठवले. उर्वरित रकमेकरिता बॉन्ड लिहून घेतला. “ठरलेल्या तारखेला पैसे न दिल्यास तुला व तुझ्या भावाला ठार करू” अशी धमकी देऊन आरोपींनी त्यांना सोडले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अचिन व सचिन चव्हाण आणि सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »