कुकडी कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यादेवीनगर : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी आपल्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन करत आहेत. श्रीगोंद्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून (सहकारमहर्षी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखाना) ऊस गाळपाची थकलेली रक्कम मिळावी या मागणीसाठी त्यांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनापासूनच आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांचा संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

Kukadi sugar hunger Strike

गेल्या गाळप हंगामापासून बंद असलेल्या कुकडी सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ च्या गळीत हंगामातील उसाचे पैसे वारंवार पाठपुरावा करूनही दिले नाहीत, असा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारखान्याने प्रति टन २८०० रुपये दर देण्याचे कबूल केले होते आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी कुकडी कारखान्याला ऊस पुरवठा केला. मात्र, त्या उसाची रक्कम गेल्या दोन वर्षांपासून थकवण्यात आली आहे . दिघी (ता. नेवासा) येथील शेतकरी संजय नागोडे, लक्ष्मी नागोडे, मच्छींद्र गवळी या ऊस उत्पादकांनी प्रादेशिक सहसंचालकांना (साखर) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही शेतकऱ्यांना ऊस गाळपाची रक्कम दिली असली तरी, अनेक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अजूनही थकीत आहेत. कारखान्याने केवळ आश्वासने देऊन फसवल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी ७ जुलै रोजी आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यावर कुकडी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी ४ ऑगस्ट रोजी गाळपास ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासनही पाळले न गेल्याने शेतकऱ्यांना अखेर उपोषणाचे कठोर पाऊल उचलावे लागले.

सध्या नेवासा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असूनही, सलाबतपूर, गळनिंब, गोगलगाव, दिघी, जळका, खडका आदी गावांतील शेतकरी टेम्पोमध्ये बसून आपला संघर्ष कायम ठेवला आहे.

या उपोषणाला शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष अशोक काळे, बाबासाहेब नागोडे, राहुल कुलकर्णी, टिल्लू गव्हाणे तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय बनसोडे यांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »