कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळांना शेतकऱ्यांची पसंती!

गूळनिर्मितीतून वाढता नफा, स्थानिकांना रोजगाराची संधी
पुणे : उसाला कारखान्यात मिळणाऱ्या दरापेक्षा गूळनिर्मितीतून अधिकचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळांना प्राधान्य दिले आहे. शेतीतून थेट कच्च्या मालाचे विक्रीयोग्य उत्पादन तयार करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप केल्याने बहुतांश ऊस संपला आहे, त्यामुळे राज्यातील काही विभागातील गाळप हंगाम आटोपला आहे. तरीही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही गावांत पारंपरिक तसेच आधुनिक गुऱ्हाळघरे सुरू असून गूळ उत्पादन सुरूच आहे. प्रक्रिया उद्योगामुळे शेतीच्या कच्च्या मालाला अधिकचा भाव मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
नफा आणि गणित
कारखाने उसाला प्रतिटन ३,००० ते ३,१५० रुपयांचा दर देत आहेत. मात्र, दोन टन ऊस गाळपातून तीन क्विंटल गूळ तयार होतो. गुळाला बाजारात चार हजार रुपये दर मिळाल्यास प्रतिआदन १२ हजार रुपयांचे उत्पादन होते. खर्च वजा जाता शेतकऱ्यांना प्रतिआदन तीन हजार रुपयांचा नफा मिळतो. कारखान्याच्या दराप्रमाणे त्याच उसाला केवळ सहा हजार रुपये मिळतात. त्यामुळे गूळनिर्मिती शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे.
अडचणीही कायम
ढगाळ वातावरण, पावसाळी हवामान आणि वादळी वाऱ्यामुळे काही गुऱ्हाळघरांचे नुकसान झाले आहे. तरीही शेतकरी गूळनिर्मिती सुरू ठेवत असून, स्थानिक मजुरांना रोजगाराची संधी मिळत आहे.






