ऊस व्यवस्थापन मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस शेती फायदेशीर ः माजी आमदार धोंडे
बीड : आष्टी तालुक्यातील कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या ‘योग्य ऊस व्यवस्थापन’ या विषयावरील भव्य मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्याला माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर ऊस तंत्रज्ञान तज्ज्ञ नवनाथ गायकवाड, सीओओ विठ्ठल भापकर, युवा नेते डॉ. अजय धोंडे, चेअरमन राजेंद्र धोंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आयआय केअर फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना माजी आमदार धोंडे यांनी सांगितले की, अति पाणी आणि अति खतांचा वापर टाळून जमिनीचा पोत जपला पाहिजे. योग्य अंतर, ठिबक सिंचन आणि जमिनीच्या चाचणीनुसार खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्च घटतो. बीज प्रक्रिया आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास ऊसाची प्रत सुधारते. बदलत्या काळात योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. दीर्घकाळ अडचणीत असलेला महेश सहकारी साखर कारखाना पुन्हा कार्यान्वित होत असून, हा कारखाना परिसरातील ऊस उत्पादकांसाठी आशेचा किरण ठरेल.
मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना ऊस तज्ज्ञ नवनाथ गायकवाड (नाना) यांनी ‘ कमी खर्चात अधिक उत्पादन’ या सूत्रावर भर दिला. प्रास्ताविकात शिवाजी थोरवे यांनी १९७४ पासूनचा कारखान्याचा इतिहास मांडला. दुष्काळ आणि आर्थिक संकटांवर मात करत कारखाना पुन्हा उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले. विठ्ठल भापकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले, तर व्हिडिओ सादरीकरणाद्वारे शेतकऱ्यांना ऊस लागवडीच्या नवीन पद्धती समजावून सांगण्यात आल्या.
या मेळाव्यास अभय राजे बोंडे, पांडुरंग नागरगोजे, अशोक साळवे, नियामत बेग, अॅड. हनुमंत थोरवे, अॅड. भाऊसाहेब लटपटे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना माजी आमदार भीमराव धोंडे. यांच्यासह आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, जामखेड व कर्जत तालुक्यातून शेकडो शेतकरी उपस्थित होते.
कुकडी, उजनीच्या पाण्यामुळे बळ
कुकडी आणि उजनीच्या पाण्यामुळे परिसरात ऊस शेतीला पोषक वातावरण आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास केवळ शेतकरीच नव्हे, तर मजूर आणि वाहतूकदारांचीही आर्थिक घडी मजबूत होईल. असे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी व्यक्त केले.






