ऊसतोड मुकादमावर टोळीचा जीवघेणा हल्ला

गंगाखेड : येथील ऊसतोड मुकादमावर आठ जणांच्या टोळीने चाकू, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील लहुजीनगर येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यलप्पा व्यंकटी पवार (रा. लहुजीनगर) या ऊसतोड मुकादमाने गंगाखेड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन त्र्यंबक जाधव व त्याच्या सात साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, रविवारी सकाळी ११ वाजता यलप्पा व्यंकटी पवार हे आपल्या घरासमोर उभे असताना अचानक आठ जण काठ्या, लोखंडी रॉड आणि चाकू घेऊन आले. यावेळी त्यांनी तुझ्या मुलाने आमची डुकरे चोरी केल्याचा आरोप करत त्यांनी पवार यांच्यावर हल्ला चढवला. सचिन जाधव याने चाकूने पवार यांच्या उजव्या पायावर वार करून त्यांना जखमी केले, तर इतर आरोपींनी काठ्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादी यलप्पा व्यंकटी पवार यांनी म्हटले. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात सचिन त्र्यंबक जाधव व त्याच्या सात साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद झाला आहे.






