वादग्रस्त खेडकरची साखर उद्योगातही गुंतवणूक
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील आणि माजी सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकरही सध्या चर्चेत असून, तेदेखील त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांमुळे वादग्रस्त बनले आहेत. त्यांनी साखर उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.
डिलिजन्स शुगर अँड ॲग्रो प्रा. लि. या कंपनीचे ३ हजार शेअर दिलीप खेडकर यांच्या नावावर आहेत. ही माहिती त्यांनी स्वत:च त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. नगर लोकसभा मतदारसंघातून खेडकर यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीच्या तिकीटावर ते लढले आणि 13749 मते घेतली. या निवडणुकीसाठी खेडकर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. त्यात विविध उद्योगातील गुंतवणुकीबद्दलही माहिती दिली आहे.
पुण्यात प्रशिक्षणासाठी नेमणुकीवर आलेल्या पूजा खेडकर या आयएएस अधिकारी त्यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे चर्चेत आल्यानंतर त्यांना पुणे पोलिस, पुणे जिल्हाधिकारी, आरटीओ आदींनी नोटिसा पाठवल्या. त्यातच पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांचे हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकावण्याचे कथित प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात मनोरमा यांच्यासह त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्यावरही पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्यांच्याभोवतीचे वादग्रस्त वलय वाढत चालले आहे.
दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळामध्येही विभागीय अधिकारी होते. यानिमित्ताने त्यांचा अनेक साखर कारखान्यांशी संबंध आला आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरीबाबत काही तक्रारी आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी याबाबत जनसुनावणी झाली. त्यासाठी नेमण्यात आलेल्या पॅनलचे सदस्यही खेडकर होते. हा साखर कारखाना सध्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी सबंधित आहे.
या समितीच्या अध्यक्ष त्यावेळच्या उपविभागीय अधिकारी जयश्री कटारे होत्या. अनेक वर्षे कार्यरत असल्यामुळे खेडकर यांचे महसूल विभागाशी असलेले ‘वेगळे संबंध’ लपून राहिले नाहीत. महसूल विभागाशी संघर्षाशी ठिणगी ही पूजा खेडकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अँटिचेंबर ताब्यात घेण्यावरून पडली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आले. हे ‘अँटिचेंबर’ म्हणजे खासगी हितगुज कक्ष कशासाठी असते, हा सर्वसामान्यांना पूर्वीपासून सतावणारा मोठा प्रश्न आहे.
विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या पराभवाचे काही प्रमाणात खेडकर हेदखील वाटेकरी आहेत, असा राजकीय समज निर्माण झालेला आहे, या प्रकरणाला हीदेखील एक किनार आहे.
एखादा वरिष्ठ अधिकारी उदा. आयएएस, आयपीएस, राजकारणात सक्रिय झाल्यानंतरच अशी प्रकरणे कशी चव्हाट्यावर येतात, असाही सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.
दरम्यान, दिलीप खेडकर यांनी आपल्या मुलीवरील सर्व आरोप फेटाळून लावत तिची पाठराखण केली आहे. तसेच कोणताही दोष नसताना तिला छळले जात आहे, असेही ते म्हणाले. ‘इंडिया टुडे’शी बोलत असताना दिलीप खेडकर यांनी आपली मुलगी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरशी संबंधित प्रकरणावर भाष्य केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती मिळाली असताना जागा आणि इतर सुविधांची मागणी केल्यानंतर पूजा खेडकर चर्चेत आल्या. त्यावर बोलताना दिलीप खेडकर म्हणाले की, माझ्या मुलीने बसण्यासाठी जागा मागून कोणतीही चूक केलेली नाही.
पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी बसण्यासाठी वेगळी केबिन, हाताखाली कर्मचारी आणि सरकारी वाहनाची मागणी केली होती. तसेच वरिष्ठ अधिकारी बाहेर गेले असताना त्यांच्या दालनावर कब्जा करत त्यांचे सर्व साहित्य दालनाबाहेर काढले होते.
माझ्या मुलीने चुकीचे काहीही केले नाही
या प्रकरणावर बोलताना दिलीप खेडकर म्हणाले, “माझ्या मुलीने चुकीचे काहीही केलेले नाही. एका महिलेने बसण्यासाठी जागा मागणे चूक आहे का? हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे आणि त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली आहे. त्यामुळे अंतिम निकाल काय येतो, याची आपण वाट पाहूया. याक्षणी मी एवढेच सांगू शकतो की, कुणीतरी जाणूनबुजून हा मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करत आहे.”
पूजा खेडकर यांनी दिले ओबीसीचे खोटे प्रमाणपत्र?
पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेयरचे प्रमाणपत्र सादर केल्याबाबतचाही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आम्ही चौकशी समितीसमोर आमचे म्हणणे मांडू. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणावर आम्ही काही बोलू शकत नाही. जे काही झाले, ते सर्व काही नियमानुसार झाले असून कोणतेही चुकीचे काम झालेले नाही
खेडकर यांनी मोठी माया कमावल्याची चर्चा सुरू आहे. . खेडकर यांच्यावर गेल्या वर्षी विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. त्याबाबत लवकरच सविस्तर वृत्त देत आहोत.