ऊस उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक

सांगली : ऊसतोड मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून मिरज येथील एका शेतकऱ्याला तब्बल ११ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मौलसाब काशिमसाब बारडोल (रा. निंवर्गी, ता. चडचण, जि. विजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शांतिनाथ शामराव आडमुठे (वय ४२, रा. दुधेश्वर मंदिराजवळ, दुधगाव, ता. मिरज) या ऊस उत्पादक शेतकऱ्याने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आर्थिक फसवणुकीची घटना २८ मे २०२१ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे. आरोपी मौलसाब बारडोल याने फिर्यादी शेतकरी आडमुठे यांचा विश्वास संपादन केला. ऊसतोड मजूर पाठवण्याचे आमिष दाखवून त्याने आडमुठे यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने ११ लाख १५ हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे ऊसतोड मजूर न पाठवता बारडोल याने टाळाटाळ केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शांतिनाथ शामराव आडमुठे (४२, रा. दुधेश्वर मंदिराजवळ, दुधगाव, ता. मिरज) यांनी फिर्याद दाखल केली आहे, त्यानुसार बारडोल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.