ऊस वाहतूकदाराची आर्थिक फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल

सातारा : कराड येथील एका ऊस वाहतूकदाराची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील तिघांवर कराड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण विक्रम काळे (रा. माळेगाव, ता. माढा, जि. सोलापूर), अशोक शिवाजी देवकाते (रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि राजकुमार पिंक्या पवार (रा. बोरगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भास्करराव रामचंद्र मोहिते (रा. बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्करराव मोहिते हे १० वर्षांपासून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला ट्रॅक्टरद्वारे ऊसवाहतूक करतात. २०१९-२० मध्ये ऊस तोडणीसाठी प्रवीण विक्रम काळे याने एक लाख ७४ हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली. त्याने कारखाना सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत काम करण्याचे कबूल केले होते. मात्र, ते मधूनच ९७ हजारांची परतफेड न करता व काम न करता काहीही न सांगता निघून गेले. तक्रारदाराने वारंवार पैसे परत मागूनही पैसेही परत केले नाहीत. मुकादम अशोक शिवाजी देवकाते याने ऊस तोडणीसाठी २२ ऊस तोडणी कामगार देतो, असे सांगून १२ लाख २० हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली. त्यातील चार लाख ७५ हजार रुपये परतफेड न करता काहीही न सांगता निघून गेले. वारंवार पैसे परत मागूनही पैसेही परत केले नाहीत. २०२१-२२ मध्ये ऊस तोडणीसाठी मुकादम राजकुमार पिंक्या पवार याने दहा ऊस तोडणी कामगार पुरवण्यासाठी आगाऊ रक्कम तीन लाख २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर मधूनच एक लाख १५ हजार रुपयांची परतफेड न करता व काम न करता तो निघून गेला. संबंधित तिघांनी सहा लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार भास्करराव मोहिते यांनी दिली, त्यानुसार संबंधित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास कराड पोलिस करत आहेत.





