आर्यन शुगरच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल

बार्शी : खामगाव येथील आर्यन शुगर प्रा.लि. या खासगी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळ व तत्कालीन शाखा अधिकाऱ्यांसह १० जणांवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये आ. सोपल यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.
आर्यन शुगर प्रा. लि. चे संचालक योगेश सुधीर सोपल, सुधीर गंगाधर सोपल, अलका सोपल, उज्ज्वला सोपल, विलास दगडूअप्पा रेणके, अविनाश भोसले, श्रीकांत गोपाल नलवडे, राजू वसंतराव भोसले, तत्कालीन शाखाधिकारी आर. एस. उबेरदंड, तत्कालीन बँक निरीक्षक व्ही. एस. आगलावे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
बार्शीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी राहुल खुने यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आर्यन शुगर प्रा.लि. यांना १८ सप्टेंबर २०१२ रोजी ५५ कोटी रुपयांचा कर्ज रोखा मंजूर करण्यात आला होता. या कर्जाच्या बदल्यात कारखान्याच्या गोदामातील साखर तारण ठेवण्याची अट बँकेने घातली होती. कर्जाची रक्कम मंजूर करताना कर्जाच्या अटीही स्पष्ट करण्यात आल्या होत्या. तरीही संचालक मंडळाने बँकेच्या गोडाऊनमधील साखरेची विक्री केली. त्या साखर विक्रीतून कारखाना प्रशासनाकडे आलेली रक्कम बँकेच्या तारण कर्ज खात्यात न भरता ती रक्कम इतर कर्ज खात्यात भरली.
सदर रक्कम बँक कर्ज तारण खात्यात न भरल्याने बँकेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. बँकेच्या निरीक्षकाने दिलेल्या अहवालानुसार, साखरेची विक्री करून आलेली रक्कम कर्ज खात्यात न भरता अन्य खात्यात भरली गेली आहे. त्यानुसार, या प्रकरणातील सर्व आरोपींवर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी संबंधित १ ते १२६ साक्षांकित दस्तऐवज सादर केले आहेत. या व्यवहारामुळे, बँकेच्या मालतारण कर्ज खात्यात सुमारे ४२ कोटी २६ लाख रुपये बाकी आहेत. या फसवणुकीमुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधितावर आहे, असे बँकेने तक्रारीत म्हटले आहे.
सध्या आर्यन शुगरची मालकी खा. बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी ॲग्रो ग्रुपकडे आहे. २०२२ रोजी हा कारखाना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी येडेश्वरी ॲग्रोला विकला. त्यापूर्वी वरील संचालक मंडळ अस्तित्वात होते.