पाटण तालुक्यात आगीचे तांडव! ७० एकर ऊस जळून खाक

सातारा : पाटण तालुक्यातील खिलारवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी आगीची एक भीषण घटना घडली. खिलारवाडी नजीकच्या तामचीवाडा शिवारात लागलेल्या या आगीत तब्बल ७० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला असून, यामुळे शेतकऱ्यांचे ८ ते १० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
धूम्रपानामुळे आग लागल्याची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धूम्रपान करून पेटती काडी किंवा थोटूक उसाच्या फडाजवळ टाकल्याने ही आग लागल्याची प्राथमिक चर्चा आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. वेताळवाडी येथील हनुमान पाणीपुरवठा इरिगेशनपासून ते खिलारवाडी शिवारापर्यंत ही आग पसरली होती.
६ तास आगीचे तांडव
दुपारी १ वाजता सुरू झालेली ही आग सायंकाळी ६ वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल सहा तास धगधगत होती. आगीचे लोट इतके भयानक होते की, लांबूनही धुराचे लोट दिसत होते. स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी जिवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे ही आग लगतच्या इतर शेतांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले, अन्यथा नुकसानीचा आकडा अजून वाढला असता.
१९हून अधिक शेतकऱ्यांना फटका
या भीषण आगीत किशोर पवार, तुकाराम पवार, रमेश पवार, सचिन नलावडे, सचिन माने, सुहास नलावडे, बाजीराव पवार, हर्षवर्धन जाधव यांसह सुमारे १९ हून अधिक शेतकऱ्यांचे पीक डोळ्यादेखत जळून भस्मसात झाले. वर्षभर कष्ट करून हाती येणारे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
कारखान्याचा मदतीचा हात
घटनेची माहिती मिळताच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग नलावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी सांगितले की, “जळालेला ऊस वाया जाऊ नये यासाठी अतिरिक्त ऊसतोड टोळ्या मागवण्यात आल्या आहेत. पुढील दोन दिवसांत सर्व जळालेला ऊस तातडीने कारखान्याकडे गाळपासाठी नेला जाईल.”
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतात वावरताना हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.






