कारखान्यातील वजनकाटा तपासणीसाठी आता भरारी पथके
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून यंदाही राज्यात भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत राज्यातील सर्व कारखान्यांमधील ऊस वजनकाट्यांची तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी गाळप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे. राज्यातील अनेक शेतकरी संघटनांची कारखान्यातील वजनकाट्यांची नियमित तपासणी करण्याची सततची मागणी होती. साखर आयुक्तांच्या या निर्णयामुळे, अनेक शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
साखर आयुक्तांच्या काय आहेत सूचना?
प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यरत साखर कारखान्यांच्या प्रमाणात तालुकानिहाय अथवा जिल्हा स्तरावर भरारी पथकाची स्थापना करावी. या भरारी पथकांमध्ये महसूल, पोलिस, वैद्यमापन शास्त्र विभाग, प्रादेशिक साखर सहसंचालक व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी. जिल्हास्तरावरील भरारी पथक स्थापन केल्यास जिल्हास्तरावरील अधिकारी भरारी पथकात सदस्य राहतील. भरारी पथकातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक कार्यक्षेत्रातील साखर कारखाने व शेतकऱ्यांना उपलब्ध होतील अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात यावीत. जिल्ह्यातील भरारी पथकांनी स्वयंस्फूर्तीने कारखानास्थळावर अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे, याची खात्री करावी. एखाद्या साखर कारखान्याबाबत उसाच्या वजनावावत गैरप्रकार होत असल्याची तक्रार यंत्रणेस किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यावर लगेच त्या साखर कारखान्यांच्या वजनकाट्याची तपासणी करावी आणि गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत.