उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी या गोष्टी विसरू नका!

– डॉ. सुरेशराव पवार
ऊस पिकाबाबतीत अधिक उत्पादनाबरोबरच शाश्वत उत्पादन महत्वाचे आहे. कोणत्याही व्यवसायात सातत्य असावे लागते, तसेच शेती व्यवसायामध्ये शाश्वत उत्पादन मिळविणे महत्वाचे आहे. ऊस पिक लागवडीकडे शेतकर्यांचा कल असण्याचे कारण त्या पिकामधून शाश्वत आर्थिक लाभ हे आहे. ऊस पिकास मिळणारा दर हा शाश्वत असतो. कारण या पिकासाठी साखर कारखानदारी भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात गेल्या 60-70 वर्षामध्ये वाढत गेली.

या कारखानदारीमुळे हे पीक ज्या भागात घेतले जाते तो परिसर सर्वार्थाने विकसित झाल्याचे आपणास पाहावयास मिळते. त्यामुळे सामाजिक विकास, राजकीय विकास, शैक्षणिक विकास आणि कृषि क्षेत्रामध्येही विकास झाल्याचे आपणास दिसून येईल. असे असले तरी शास्त्रोक्त पद्धतीने या पिकाचा अभ्यास करून ऊस शेती केली तर निश्चितपणे शेतकर्यांच्या विकास आणि फायदा वाढविण्यासाठी वाव आहे. या पिकाचे जास्तीत जास्त आणि शाश्वत उत्पादन घेऊन, अधिक आर्थिक फायदा मिळविण्यासाठी मुद्यांचा विचार करावा.
1) जमिनीची सुपीकता टिकवणे,
2) आधुनिक पद्धतीने जमिनीची मशागत
3) हंगामनिहाय लागवड,
4) लागवडीसाठी रुंद सरींचा वापर
5) रोपांची लागवड,
6) नवीन आणि शिफारसित वाणांचा लागवडीसाठी वापर,
7) उसाच्या पक्वतेनुसार तोडणी कार्यक्रम रावबणे
8) शुद्ध आणि निरोगी बेणेमळा तयार करणे,
9) सुधारित आणि शास्त्रोक्त पद्धतीने पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा ठिबक प्रणालीद्वारे वापर,
10) अन्नद्रव्यांचा एकात्मिक पद्धतीने वापर
11) एकात्मिक पद्धतीने आणि वेळेवर आंतरमशागत,
12) आंतरपिकांची लागवड,
13) शाश्वत आर्थिक फायद्यासाठी सुधारीत पद्धतीने खोडवा व्यवस्थापन आणि
14) प्रिसिजन फार्मिंग म्हणजेच पिकाला जेवढे हवे तेवढेच घटक वापरून शेती करणे या पद्धतीचा अवलंब करावा लागेल.
या सूत्रांपैकी पहिली दोन सूत्रे जमिनीची सुपीकता टिकवणे आणि तिची सुधारित पद्धतीने मशागत हे शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
जमिनीची सुपीकता टिकवून, तिचा पोत सुधारणे:
महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यामध्ये ऊस या एकाच पिकाची लागवड करतात. ऊस लागवडीचे पीक आणि एक किंवा दोन खोडवे घेऊन परत उसाचीच लागवड करतात. ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. ऊस पिकाची लागवड केल्यानंतर खोडव्याची दोन किंवा तीन पिके घ्यावीत. या दोन्ही खोडव्यातील पिकांमध्ये पाचटापासून चांगल्या प्रकारचे सेंद्रीय खत तयार केल्यास जमिनाचा सेंद्रीय कर्ब वाढणास मदत होते आणि तिची सुपीकता वाढते.
लागवडीचा ऊस आणि दोन खोडवा पिके घेतल्यानंतर द्विदलवर्गीय पिकाची लागवड करून फेरपालट केल्यास, जमिनीची सुपीकता टिकवण्यास मदत होते. महाराष्ट्रात शेतकर्यांचे जमीन क्षेत्र कमी होत गेले आहे. त्यामुळे पिकांची फेरपालट करणे आणि मशागत करणे शेतकर्यांना अडचणीचे झाले आहे. यासाठी शेतकर्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती केल्यास जमिनीची सुपीकता टिकवण्यास हातभार लागतो.
सेंद्रीय खातांचा आणि जीवाणू खतांचा वापर केल्यास हे शक्य आहे. जीवाणू खतांची निर्मिती साखर कारखान्यांनी करून ते सभासद शेतकर्यांना उपलब्ध करून दिलास, रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन उत्पादन खर्चातही बचत होते आणि जमिनीचा पोतही सुधारतो हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने नत्र उपलब्ध करून देणारे अॅसिटोबॅक्टर सारख्या जीवाणू खतामुळे नत्रा मध्ये 50% बचत करू शकतो. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, कारण हे जीवाणू हवेतील नत्र ऊस पिकाच्या पानात स्थिर करतात. त्याचा पिकाला सहज लाभ होतो.
दुसरी दोन महत्त्वाची अन्नद्रव्ये म्हणजे पालाश आणि स्फुदर.. या होन्ही अन्नद्रव्यासाठी स्फुदर विरघळवणारे जीवाणू आणि पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू खते वापरल्यास रासायनिक खतामध्ये 25 टक्के बचत होते, म्हणून जीवाणू खतांचा वापर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.
ऊस पिकानंतर फेरपालटीचे पी घेणे अत्यंत महत्वाचे आहे; परंतु कमी धारण क्षेत्रामुळे ते शेतकर्यांना घेता येत नाही. म्हणून ऊस पिकात द्विदलवर्गीय आंतरपीके घेतल्यास जमिनीची सुपीकता टिकवण्यास उपयोग होतो. या पिकामध्ये सध्या सोयाबीन हे महत्त्वाचे पीक ऊस पिकाच्या आधी किंवा आंतरपिक म्हाणून घेता येईल. या पिकाचा पाला, मुळ्या व इतर भाग शेतामध्ये गाडला गेल्यामुळे सेंद्रीय पदार्थांची उपलब्धता वाढून, जमिनीचा पोत सुधारून सुपीकताही वाढते. सोयाबीन पिकाला चांगला दरही मिळत आहे, त्यामुळे साखर कारखानदारी क्षेत्रात सोयाबीन प्रक्रिया उद्योगही वाढत आहे.
सहकारी किंवा खासगी साखर कारखान्यांनी या दोन्ही पिकांची लागवड करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थाची निर्मिती केल्यास शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि आर्थिक उत्पन्नाची शाश्वतीही शेतकर्यांना मिळू शकते. या पदार्थामुळे पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल नाही जमिनीची सुपीकता टिकून राहील. म्हणून या पद्धतीचा अवलंब साखर कारखान्यांनी प्राधान्याने करावा.
आधुनिक पद्धतीने जमिनीची मशागत महत्त्वाची
ऊस पिकासाठी जमिनीची निवड आणि तिची मशागत अत्यंत महत्त्वाचा घटक आहेए. ऊस पिकासाठी मध्यम खोल आणि सुपीक जमीन निवडावी.
त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खातांचा भरपूर वापर करावा, पिकांची फेरपालट, जैविक खतांचा वापर, माती परीक्षणानुसार रासायनिक खातांचा समतोल वापर, क्षारयुक्त व चोपड जमिपनीत भू-सुधारकांचा वापर, एकात्मिक सेंद्रीय पद्धतीचा अवलंब, अच्छादनाचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर, पिकांचे अवशेष न जाळताशेतात पुनर्वावर आणि जमिनीची धूप थांवण्यासाठी मृदसंधारण आणि जलसंधारण पद्धतीचा अवलंब या सर्व बाबींचा अवलंब करावा.
ऊस शेतीमध्ये वर्षानुवर्षे एकाच जमिनीत पीक घेतल्यामुळे अती पाण्याच्या वापरामुळे जमिनी टणक झाल्याआहेत. यासाठी उभी – आडवी खोल नांगरट करणे, सब सॉयलरचा वापर करून जमिनीचा टणक थर मोडून ती भुसभुशीत केल्यास ऊस उत्पादकता वाढते.
ऊस हे 12 ते 18 महिने शेतात उभा असतो आणि त्यानंतर कमीत कमी तीन खोडवे घेतले तर हे पिक 4.5 ते 5 वर्ष एकाच जमिनीत उभे राहणार असल्याने जमिनीची पूर्वमशागत चांगली करून, ती भुसभुशीत करणे अत्यंत आवश्यक आहे. उसाची मुळे मध्यम, काळ्या जमिनीत एक मीटरपर्यंत खोल जातात. म्हणून ऊस लोळत नाही. सर्व थरातून अन्नद्रव्ये जातात. ऊस जोमाने वाढतो आणि अधिक उत्पादन मिळते.
जमीन उभी-आडवी 30 ते 40 सेमींपर्यंत खोलवर नांगरट, वाफसा असताना, 15 दिवसांच्या अंतराने करावी. खोल नांगरटीमुळे जमीन भुसभुशीत होते आणि हवा खेळती राहते. पूर्वीच्या पिकाचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन सेंद्रीय पदार्थाची भर पडते, जीवाणूंची संख्या वाढते, पाण्याचा चांगला निचरा होतो आणि पर्यायाने जमिनीची सुपीकता वाढते.
दुसर्या नागंटीच्या आधी चांगले कुजलेले शेणखत / कंपोष्ट खत/ बायोअर्थ खत जमिनीला द्यावे. हे सर्व केल्यानंतर रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करावी. शेणखत उपलब्ध नसल्यास तागासारखे हिरवळीचे खत द्यावे. यानंतर 4 ते 5 फुट अंतरावर सरी काढून त्यामध्ये ऊसाची लागवड करावी. अशा प्रकारे जमिनीची सुपीकता टिकवणे आणि आधुनिक पद्धतीने मशागत केल्यास एक लागवडीचे आणि कमीत कमी दोन खोडवा पिकांचे 4 ते 5 वर्षातील उत्पन्न 60 ते 80 टनांपर्यंत आले तरच आपण शाश्वत उत्पन्न आले, असे म्हणू शकू.
(लेखक नामवंत ऊस संशोधक आणि पाडेगाव मध्यवर्ती ऊस विकास केंद्राचे निवृत्त शास्त्रज्ञ आहेत)