ऊसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

सांगली : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने समडोळीतील एका वाहतूकदाराची तब्बल ८.४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंकुश मधुकर गेजगे (वय ३५) आणि दिलीप मधुकर गेजगे (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी भाऊसाहेब लक्ष्मण देसाई यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी भाऊसाहेब देसाई हे समडोळी येथील वाहतूकदार आहेत. त्यांना सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी ऊसतोड कामगार हवे होते. त्यासाठी त्यांनी गेजगे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी कामगार पुरविण्याचे आश्वासन दिले. देसाई यांनी दोघांना सुरुवातीला ११ लाख ७५ हजार, त्यानंतर ५ लाख २५ हजार असे १७ लाख रुपये दिले होते. त्यानंतर संशयितांनी कामगार पुरवून ८ लाख ६० हजार रुपयांची परतफेड केली. पण त्यानंतर कामगारच पुरविलेच नाहीत. फिर्यादी देसाई यांनी त्यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करूनही ते पैसेही परत दिले नाहीत. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी देसाई यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अंकुश मधुकर गेजगे (वय ३५) आणि दिलीप मधुकर गेजगे (वय २५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.






