जागृती शुगरतर्फे ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी

लातूर : देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज आणि राज्य शासनाचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लासोना येथे झालेल्या या शिबिरात मजुरांची आरोग्य तपासणी, लसीकरण आणि सर्वरोग निदान करण्यात आले.
नागराळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने लासोना येथे आणि जिथे प्रत्यक्ष ऊसतोड सुरू आहे, तिथे जाऊन मजुरांची मोफत तपासणी केली. तसेच आजारी मजूर, मुकादम आणि वाहन चालकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने महिला ऊसतोड मजुरांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील एकघरे, डॉ. श्याम हिबाने यांच्यासह कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले, मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य मानला जात आहे.





