एफआरपी थकबाकी देणे बंधनकारक : साखर आयुक्त
पुणे- यावर्षीचा ऊस गळीत हंगाम सुरु झाला आहे. सर्व गाळप वेळेत पूर्ण करण्यासाठी यंदा साखर आयुक्त कार्यालयाने काय तयारी केली आहे? याबाबत ‘शुगरटुडे’ने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून माहिती घेतली.
यावर्षीही ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 14.87 लाख हेक्टर ऊस क्षेत्र आहे. सुमारे १५०० लाख टन ऊसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखर उत्पादनही वाढून ते 150 लाख टनांवर जाईल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली..
यातील 12 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळं मार्केटसाठी प्रत्यक्ष साखर उत्पादन 138 लाख टन होणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
२०२२-२३ च्या गळीत हंगामात 203 कारखाने यंदा सुरू होणार आहेत. काही बंद असलेलं कारखानेही गाळप करणार आहेत. त्यामुळे गाळप हंगाम वेळेत संपण्याला मदत होण्याची आशा आहे. पुढील वर्षी एप्रिलअखेर तो चालेल, त्यापुढे जाणार नाही, असे सांगून साखर आयुक्त म्हणाले, की गाळप हंगाम 160 दिवसांचा असेल आणि सरासरी साखर उतारा हा 11.20 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
यंदा इथेनॉल उत्पादनातसुद्धा वाढेल. ते 119 कोटी लिटर पर्यंत जाईल, अशी माहिती देताना, इथेनॉलमुळे मागचा साखर हंगाम सर्वांसाठी चांगला राहिला, असे आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.
गेल्या हंगामातील सुमारे तीनशे कोटी एफआरपी रुपयांची थकबाकी 60 साखर कारखान्यांकडे आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत अशा कारखान्यांना गाळप परवाने दिले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका साखर आयुक्तांनी घेतली आहे.