राज्यात ७ हजार कोटींची एफआरपी जमा; अद्याप २,३२४ कोटी थकीत

पुणे : २०२५-२६ च्या चालू ऊस हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत ७ हजार २६ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ जमा केली आहे. मात्र, अद्यापही २ हजार ३२४ कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. साखर आयुक्तालयाने १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यातील १८४ कारखान्यांनी २४८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ९ हजार ६५० कोटींच्या देय रकमेपैकी केवळ ७२% रक्कम अदा करण्यात आली असून, फक्त ५२ कारखान्यांनी १००% एफआरपी दिली आहे. थकबाकीवर १५% व्याज देण्याच्या सूचना असूनही, आरआरसी (RRC) कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
प्रशासनाची जप्ती कारवाई कधी?
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचे २ हजार ३२४ कोटी रुपये अजूनही कारखानदारांकडे अडकलेले आहेत. साखर आयुक्तालयाने व्याजासह पैसे देण्याचे आदेश देऊनही कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे, सुनावण्या होऊन तीन आठवडे उलटले तरी दोषी कारखान्यांवर जप्तीची (RRC) कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नसल्याने “शेतकऱ्यांचे पैसे नेमके मिळणार कधी?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.






