टनाला ४,६७५ रुपये ऊस दराची सर्वत्र चर्चा

पुणे : गुजरातमधील ‘गणदेवी’ उद्योगाने एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या उसाला रू. ४६७५ प्रति टन दर देण्याची घोषणा केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यावर अवघ्या साखर उद्योगात चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल असलेले दिसून आले आहे. नुकत्याच संपलेल्या उसाची खरेदी किंमत गुजरातच्या कारखान्यांनी जाहीर केली आहे. सहकारी साखर कारखान्यांनी २०२३-२४ हंगामात गळीतासाठी दिलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला अव्वल दर देत तेथील गणदेवी येथील सहकार खांड उद्योग लि. या साखर कारखान्याने एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या उसाला एकूण तोडणी वाहतूक खर्च धरून ४,६७५ रुपये प्रतिटन दर देण्याचे जाहीर केले आहे.
प्रतिटन ७७० रुपये तोडणी, वाहतूक खर्च वजा करता ३९०५ रुपये दर ते देणार आहेत. केवळ ११. ४७ टक्के रिकव्हरी असताना ९ लाख, १४ हजार ४९९ टन उसाचे गाळप करत १० लाख, ४८ हजार, ३३० क्विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती दक्षिण गुजरात सहकारी साखर मिल असोसिएशनने दिली.
गणदेवी कारखान्याने मार्च २०२४ साठी ३८०५ रु. व फेब्रुवारी २०२४ करता ३७०५ रुपये प्रतिटन तसेच जानेवारी २०२४ सह डिसेंबर, नोव्हेबर, ऑक्टोबर २०२३ या चार महिन्यांत आलेल्या ऊसाला ३६०५ रुपये टन याप्रमाणे दर देण्याचे जाहीर केले होते. हा दर तोडणी, वाहतूक खर्च वजा करून शेतकऱ्यांना मिळणारा दर आहे.
महाराष्ट्रात 13 रिकव्हरी ला 3300 रुपये सर्वात जास्त दर दिला आहे, तर गुजरात मधील या गणदेवी साखर कारखाण्याची 11:74 रिकव्हरी असताना त्याने 3905 रुपये यावर्षी उसाला दर देऊन एक आदर्श घालून दिला आहे, असे आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे म्हणाले.
गुजरात मधील सगळेच कारखाने दरवर्षी महाराष्ट्रातील कारखाण्यापेक्षा 500 ते 900 रुपये शेतकऱ्यांना जादा दर देत आलेले आहेत. जादा दराची ही परंपरा यावर्षी पण त्यांनी पाळली आहे.
यावर्षी चा गणदेवी चा कारखाना सुरु झाला त्यावेळी चा दर हा 3605 रुपये होता. तो जानेवारी च्या उसाला 3705 केला, फेब्रुवारीला 3805 आणि मार्चमध्ये आलेल्या उसाला तो 3905 रुपये दिला आहे. या कारखान्याचा तोडणी वाहतुकीचा खर्च 770 रुपये आलेला असून तो वजा करून 3905 रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत. म्हणजेच या कारखाण्याचा मूळ दर हा 4675 रुपये देशात सर्वात जास्त आहे. आपल्या भागातील उच्य उतारा देणाऱ्या कारखान्यांनी गुजरात च्या या कारखान्यांची रिकव्हरी व शेतकऱ्यांना दिलेला दर याचा विचार केल्यास यावर्षी किमान 4000 रुपये दर दिला पाहिजे, अशी मागणी चुडमुंगे यांनी केली.