गौरी शुगरचा ५ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण; शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ

अहिल्यानगर : जिल्ह्यातील हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर कारखान्याने चालू हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि कारखान्याचे चोख व्यवस्थापन यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. दरम्यान, कारखान्याचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे कमी कालावधीत ५ लाख टनांचे उद्दिष्ट गाठले, अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली.
वैशिष्ट्ये
बंद कारखान्यांना संजीवनी: ओंकार ग्रुपने आतापर्यंत राज्यातील १७ बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करून ग्रामीण भागात मोठी रोजगारनिर्मिती केली आहे.
शेतकरीहित सर्वोच्च: योग्य दर, वेळेवर पेमेंट आणि पारदर्शक कारभार यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये या ग्रुपने आघाडी घेतली आहे. आगामी काळात ‘नंबर वन’ गाळप करणारा समूह बनण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
नियोजनबद्ध कामकाज: उसाची वेळेत तोडणी आणि वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन केल्याने शेतकऱ्यांचा कारखान्यावरील विश्वास वाढला आहे, असे व्यवस्थापक रोहिदास यादव यांनी नमूद केले.
२०२६ च्या गाळप हंगामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाळप क्षमता वाढवण्यावर आणि परिसराच्या आर्थिक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे कारखान्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






