जिल्ह्यात उसाला एक नंबरचा भाव देणार -बाबुराव बोत्रे पाटील
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव येथील गौरी शुगरचे रोलर पूजन
अहिल्यादेवीनगर – हिरडगाव येथील गौरी शुगरचा पहिलाच गाळप हंगाम होत आहे. त्यासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याना आम्ही नगर जिल्ह्यातील एक नंबरचा भाव देणार आहोत, असे आश्वासन ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिले. ओंकार समूह हा साखर उद्योगातील राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा ग्रुप आहे, शेतकऱ्यांनी दराबाबत निर्धास्त राहावे, असे ते म्हणाले.
हिरडगाव येथे गौरी शुगरचा रोलर पुजन समारंभ शुक्रवारी (दि. १) बाबुराव बोत्रे व रेखा बोत्रे यांचे हस्ते, तर २४० केपीएलडी क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे भूमिपूजन प्रशांत बोत्रे व शारदा बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
बाबुराव बोत्रे म्हणाले, साखर निर्मिती करून ऊसाला भाव देता येणार नाही. व्यवसाय व व्यवहार डोळ्यासमोर ठेवून डिस्टीलरी क्षमता २४० केपीएलडीने वाढविणार आहे. त्यामुळे दररोज तीन लाख लिटर इथेनॉल निर्माण होणार आहे. २४ टीपीएच क्षमतेचा सीएनजी गॅस प्रकल्प तयार करण्यात येईल. प्रेसमडपासून दररोज ४०० मेट्रिक टन पोटॅश तयार करण्यात येणार आहे.
कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक रोहिदास यादव म्हणाले, बाबुराव बोत्रे यांनी गौरी शुगरच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. १५. ऑक्टोबरला कारखाना सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज करणार आहे.
यावेळी मिलिंद दरेकर , उस्मानाबाद येथील लक्ष्मी शुगरच्या चेअरमन स्मिता पाटील, गणेशराव डोईफोडे, संपतराव दरेकर, संतोष दरेकर, गंगाराम दरेकर, दिनेश दरेकर उपस्थित होते. नवनाथ देवकर यांनी सूत्रसंचालन केले. गौरी शुगरच्या चेअरमन गौरी बोत्रे यांनी आभार मानले.