घोडगंगा कारखान्याला निधी मिळू दिला नाही : खा. सुप्रिया सुळे

शिरूर : आ. अशोकबापू पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी करण्याचा नकार दिला आणि शरद पवारांसोबत निष्ठेने राहिले म्हणून त्यांच्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला निधी मंजूर असतानाही मिळू दिला नाही, असा आरोप करताना खा. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले.
संघर्ष हा आपल्या नशिबातच आहे. आ. अशोक पवार यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला. त्यांना आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न केला, पण हा मर्द डगमगला नाही. शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अशोक पवार नमले नाहीत. शिवाजीराव भोसले बँक अवसायनात गेली. आपल्याच मतदारसंघातील व सर्व ठिकाणाच्या खातेदारांचे, ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. त्याबद्दल नेहमीच आवाज उठवला जाईल व यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीदेखील खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. अशोक पवार यांच्या लोणी काळभोर येथील प्रचार सभेत खा. सुळे बोलत होत्या.
खा. सुळे महणाल्या, हा देश अदृश्य शक्तीने चालत नाही, तर हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. अशोक पवार यांना श्री संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटन समारंभाला बोलावले नाही. आम्हाला तर नेहमीच विरोधक टाळतात. आम्ही निधीसाठी मागणी केली की आम्हाला निधी देत नाहीत. यावेळी अशोकबापूंना मंत्रिपदाचे संकेत खा. सुळे यांनी दिले.
आम्ही विरोधी पक्षाला संपवण्याची भाषा केली नाही, करणार नाही. मी अशोक पवार यांना मत विकास करण्यासाठी मागत आहे.
अशोक पवार म्हणाले, युती सरकारने महाराष्ट्राचे राजकारण गढूळ करून टाकले आहे. ४२ आमदारांना आपला मतदारसंघ सोडता येईना. मी कॉलेज जीवनापासून शरद पवारांचा झेंडा हातात घेऊन काम करीत आहे. मी गद्दारी करणार नाही. कारण गद्दारीचा शिक्का एकदा कपाळावर बसला, तर तो मेल्याशिवाय पुसणार नाही. त्यामुळे मी शेवटपर्यंत निष्ठावानच राहणार आहे.
लोणी काळभोर येथील खोकलाई चौकामध्ये झालेल्या या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली. या वेळी उपसभापती युगंधर काळभोर, आप्पासाहेब काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच चंदर शेलार, माधव कळभोर, विकास लवांडे, जगनाथ शेवाळे, शरद काळभोर, सागर काळभोर, भारती शेवाळे, स्वप्निल कुंजीर, नाना आबनावे, सनी काळभोर, नागेश काळभोर, संदीप गोते, माधुरी काळभोर, राजेंद्र खांदवे, संतोष कुंजीर, स्मिता नॉर्टन, गोरख सातव, जगदीश महाडिक, ऋषिराज पवार, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.