घोडगंगा कारखाना आम्ही चालू करू : आमदार कटके
पुणे : घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्व संचालकांनी राजीनामे द्यावेत. हा साखर कारखाना आम्ही चालू करू, असे आश्वासन आमदार माऊली आबा कटके यांनी घोडगंगा साखर कारखान्याच्या चेअरमन व सर्व संचालकांना दिले आहे. ते गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे मतदार आभार दौऱ्याप्रसंगी बोलत होते.
आ. माऊली कटके म्हणाले, घोडगंगा साखर कारखाना सलग दोन वर्षे बंद राहिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस घालवण्यासाठी खुप अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, कोणीही घाबरु नका कारण तुमच्या शेतात आम्ही उसाचे एक टीपरुही शिल्लक राहू देणार नाही. माझा हा ऐतिहासिक विजय मी स्व. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना समर्पित करतो. सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. मतदारांनी पंधरा वर्षातील मनातील रुख रुख, नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील मतदार मतदानासाठी आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे माझे मताधिक्य घटले आहे. नाही तर लाख ते सव्वा लाखांचे मताधिक्य नक्कीच मिळाले असते. हा विजय सर्व कार्यकर्ते, मतदारांचा आहे. प्रचारात माझ्या विरोधात कुप्रचार जास्त झाला. परंतु, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष रवी काळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे, महेश ढमढेरे, संभाजीराव नांद्रे, नवनाथ शितोळे, सरपंच तुकाराम निंबाळकर, सागर फराटे, सुनील कटके, संदीप जाधव, चाचा जाधव, पोपटराव निंबाळकर, पंडित जगताप, बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते.