“Good Governance” महत्वाचा
- डी. एम. रासकर
- (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना)
(एमडी पॅनल असावे की नसावे यावर नेहमीच चर्चा झडत असतात, साहेबराव खामकर यांनी त्याला पुन्हा मुद्देसूदपणे तोंड फोडले. त्यांच्या लेखावर डी. एम. रासकर यांनी अत्यंत मार्मिक अभिप्राय दिला आहे.)
प्रथमतः मी श्री. साहेबराव खामकर पाटील यांनी हा विषय प्रामाणिकपणे उपस्थित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांनी सहकारी व खाजगी दोन्ही क्षेत्रात काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. शिवाय ‘शुगरटुडे’ ने तो चर्चेसाठी मांडला आहे. त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. या चर्चेमध्ये सर्वांनी संयम राखणे आवश्यक आहे. त्यामुळे साखर उद्योगाला चांगली दिशा मिळणार आहे.
मुळातच क्षेत्र कोणतेही असो सहकारी अथवा खाजगी कारखानदार आता सुज्ञ झाले आहेत आणि कारखाने व्यावसायिक दृष्ट्या चालवू लागले आहेत. त्यामुळे साखर कारखाने योग्य व्यक्तींची कार्यकारी संचालक म्हणुन निवड करू लागले आहेत. त्यांच्या क्षमतेची खात्री पटल्याशिवाय निवड केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला भारत देश सक्षमपणे चालवतात, त्याचं कारण म्हणजे सर्व क्षेत्रातील तज्ञ असे सुमारे 200 IAS अधिकारी पंतप्रधान कार्यालयात (PMO) बसवले आहेत. ते वेळोवेळी पंतप्रधानांना योग्य सल्ला देतात व सर्व खात्यांना कारभार चालवण्यासाठी मार्गदर्शनही करतात. हे का शक्य झालं तर UPSC सारख्या कठीण परीक्षेत पास होऊन ते पुढे गेलेले आहेत. सर्वच IAS बुद्धिमान असले तरी ते देशभक्त व चारित्र्यवान असतीलच असे नाही. कारण काही अपवादात्मक IAS सुद्धा चुकीच्या मार्गाने गेलेले दिसतात.
दुसरी बाजू म्हणजे कार्पोरेट क्षेत्र, या क्षेत्रात जे CEO/MD निवडले जातात. ते IAS ही नसतात, कुठल्या पॅनेलमधूनही निवडलेले नसतात तरी ते अत्यंत कार्यक्षम असतात. सध्या आपण साखर कारखान्यातील काही MD/CEO पाहिले तर ते अत्यंत कार्यक्षम आहेत पण त्यांची संख्या खूप कमी आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगाला तर सुमारे 200 ते 250 अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यापैकी दरवर्षी काही अधिकारी रिटायर होत असतात. काही कार्यक्षम अधिकारी रिटायरमेंट नंतरही 10-10 वर्ष उत्कृष्ट कार्यक्षमतेने काम करीत असतात.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साखर उद्योग हा ग्रामीण भागात उभारलेला असतो. त्यासाठी तो चालवणारा अधिकारी हा एक तर ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला असायला हवा अथवा त्याला साखर उद्योगात काम करण्यासाठी कुटुंबाकडून वारसा मिळालेला असायला हवा. काही एकसूत्री सहकारी साखर कारखान्याच्या 3ऱ्या 4थ्या पिढ्या कारखाने सक्षमपणे चालवत आहेत. गोदावरी शुगर्स, उगार शुगर्स व के. एम. शुगर्स यांसारख्या मोठ्या उद्योगाची पुढची पिढी देखील सक्षमपणे साखर उद्योग चालवत आहेत.
म्हणजेच साखर उद्योगात एखाद्याने प्रवेश केल्या पासूनच पुढे मला यशस्वी MD/CEO व्हायचे असे ध्येय ठेवलं व प्रत्येक टप्प्यावर आवश्यक प्रशासकीय कौशल्ये आत्मसात केल्यास साखर उद्योगाची अशा अधिकाऱ्यांची गरज भागेल असे मला वाटते. साखर उद्योग हा पूर्णपणे राजकारण मुक्त असायला हवा. बरेच कारखाने हे पथ्य पाळू लागले आहेत. तथापि काहींना त्याचे महत्त्व अद्यापही समजलेले नाही. त्यांना त्यांची झळ भविष्य काळात नक्कीच पोहोचू शकते.
आपण जर निरीक्षण केले तर IIT मधून व IIM मधून पास झालेले बहुतांशी विद्यार्थी पुढे जाऊन नेत्र दीपक कामगिरी करताना दिसतात. पण असे उमेदवार साखर कारखान्याकडे वळताना दिसत नाही. त्याची कारणे अनेक आहेत. त्यावर देखील काम करावे लागणार आहे. साखर उद्योग हा आपल्या देशातील महत्त्वाचा उद्योग आहे. आपल्या देशात आर्थिक क्रांती घडवून आणण्याची क्षमता या उद्योगात आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या उद्योगाची सूत्रे प्रतिभावंत, तज्ञ व प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात देणे महत्त्वाचं आहे.
सहकार क्षेत्रात जसे सहकार कायद्यांचे काटेकोर पालन करावे लागते. त्याच प्रमाणे खाजगी क्षेत्राला देखील अत्यंत कठीण अशा कंपनी कायद्यांचे पालन करावे लागते, अन्यथा करवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो “Good Governance” महत्वाचा आहे.
सध्या तंत्रज्ञान खूपच प्रगत होत चाललेलं आहे. सॉफ्ट स्किल्स अवगत करणं या अधिकाऱ्यांची प्राथमिकता असायला हवी. या उपर अशा पदावरील व होऊ घातलेल्या अधिकाऱ्यांना नामांकित संस्थांकडून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
हा सगळा उहापोह करण्याचे कारण म्हणजे MD पॅनल असावा की नसावा या पूरती ही चर्चा मर्यादित न राहता ती व्यापक स्वरूपात व्हायला हवी व तिचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे साखर उद्योगाला अत्यंत निष्णात MD/CEO मिळायला हवेत. परिणामी साखर उद्योगाच्या प्राप्त परिस्थितीस सर्व समस्यांना उपाय सापडतील व साखर उद्योग आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायमस्वरूपी महत्त्वाचा घटक बनेल हे निश्चित.
साहेबराव खामकर यांचा मूळ लेख वाचा
[…] “Good Governance” महत्वाचा […]