Co 18009 ऊसवाण ठरतंय फायदेशीर; भरघोस उत्पादनासह वाढीव रोगप्रतिकार क्षमता

कोईमतूर: ऊस शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद – ऊस प्रजनन संस्थेने (ICAR-SBI) दोन वर्षांपूर्वी जारी केलेल्या को १८००९ या ऊस वाणाची मागणी वाढत आहे. त्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी संस्थेतर्फे नुकताच शिवार भेटीचा कार्यक्रम घेतला. हे वाण खास करून तामिळनाडू आणि पुड्डुचेरीसाठी विकसित करण्यात आलेले आहे.
कोईमतूरमधील अन्नूर तालुक्यातील कांजपल्ली गावात आयोजित एका विशेष ‘क्षेत्र दिना’त (Field Day), संस्थेने केले होते. नव्याने विकसित केलेले ‘Co 18009’ हे मध्य-उशिरा पक्व होणाऱ्या वाणाची शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. हे वाण २०२३ साली शिफारसित करण्यात आले आहे.
जुन्या वाणांना निरोप देण्याची वेळ
या कार्यक्रमात ऊस प्रजनन संस्थेचे संचालक डॉ. पी. गोविंदराज यांनी शेतकऱ्यांना आणि विस्तार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “सध्या वापरात असलेली जुनी वाण आपली उत्पादकता गमावत असून त्यांना रोगांचा संसर्ग लवकर होत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा नफा कमी होत आहे” . त्यांनी शेतकऱ्यांना Co 18009, Co 11015 आणि Co 14012 यांसारखी नवीन आणि सुधारित वाणे तातडीने अवलंबण्याचे आवाहन केले.
मजुरांच्या टंचाईवर ‘यांत्रिकीकरण‘ हाच उपाय
शेतीपुढील वाढत्या आव्हानांवर बोलताना डॉ. गोविंदराज यांनी मजुरांच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित केला. ऊस शेती फायदेशीर आणि शाश्वत ठेवायची असेल, तर किमान ७५ टक्के शेतीकामांचे यांत्रिकीकरण (Mechanization) करणे आता काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात ऊस वाण विकसित करण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचाही थेट सहभाग घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
‘Co 18009’ ची वैशिष्ट्ये:
या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी श्रीमती निवेधा दुराईसामी या महिला शेतकऱ्याच्या शेतातील प्रात्यक्षिक फडाला भेट दिली. ११ महिन्यांच्या या पिकाबद्दल आपला अनुभव सांगताना त्यांनी या नवीन वाणाचे खालील फायदे सांगितले:
- या उसाला तुरा येत नाही (Non-flowering) .
- उसावर काटेरी लव (Spininess) अत्यंत कमी असल्याने मजुरांना काम करणे सोपे जाते.
- फुटव्यांची संख्या (Tillering) मोठी असून पेरण्यांमधील अंतर (Internodes) जास्त आहे.
- या वाणाचे उत्पादन घेण्याची क्षमता अत्यंत उच्च आहे.
साखर कारखान्यांचे आणि सरकारचे सहकार्य
‘बन्नारी अम्मन शुगर्स’चे उपाध्यक्ष एस. षण्मुगासुंदरम यांनी यावेळी कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सबसिडी योजनांची माहिती दिली. कोईमतूर जिल्ह्यात सध्या सुमारे ९४० एकरवर उसाची लागवड असून वार्षिक उत्पादन ३८,००० टन इतके आहे. नवीन वाणांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा ऊस शेतीतील रस पुन्हा वाढेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना नवीन वाणाचे बियाणे आणि मार्गदर्शक साहित्याचे वाटपही करण्यात आले.





