देशभरात पाचशे ‘ग्रीन स्टेशन’ उभारण्याचा संकल्प
पुणे : इथेनॉल, सीबीजी, कोज़नरेशनच्या माध्यमातून ‘हरित ऊर्जे’च्या (ग्रीन एनर्जी) क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा साखर उद्योग आता या क्षेत्रात संघटित आणि संरचित पद्धतीने काम करण्यास सज्ज झाला आहे. या आधारावर देशभरात पाचशे ‘ग्रीन स्टेशन’ उभारण्याचा संकल्प ‘आयएसइसी’ने (इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन) केला आहे.
त्यासाठी २०२७ ची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या ‘कोजन असोसिएशन ऑफ इंडिया’ने पुण्यात आयोजिलेल्या परिषदेत हरित ऊर्जा परिषदेत ‘भविष्यकालीन नावीन्यपूर्ण ऊर्जा केंद्र’ याविषयावर सविस्तर चर्चा झाली.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष व कोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (मेडा) अतिरिक्त महासंचालक पंकज नागलपालिवार, प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अतुल मुळे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले उपस्थित होते.
साखर उद्योगाचा हरित ऊर्जेचा परीघ विस्तारित करण्याचा विडा इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशनने उचलला आहे. दांडेगावकर हे ‘आयएसइसी’चे सहअध्यक्ष आहेत.
‘आयएसइसी’चे संचालक नाईकनवरे या वेळी म्हणाले, “साखर उत्पादनात आघाडीचा देश म्हणून भारताचा उदय झालेला आहे. मात्र, साखर उद्योग नव्या आव्हानांनाही सक्षमपणे सामोरा जात असून हरित ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेला आहे.’’
देशात ग्रीन एजर्नी स्टेशन उभारण्यासाठी ‘आयएसइसी’ला मान्यता मिळाली आहे. साखर कारखान्यांना त्यासाठी वितरक केले जाईल. येत्या दोन वर्षांत १०० तर २०२६ पर्यंत २५० आणि २०३० पर्यंत देशभर ५०० हरित ऊर्जा स्थानके उभारली जातील. त्याद्वारे जैवइंधन, जैवखते आणि जैवऊर्जा मार्केटमध्ये कारखाने काम करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘‘साखर उद्योग आता अन्नदात्यासोबत ऊर्जादाता होणार आहे. देशाच्या नव्या हरित ऊर्जा धोरणामुळे कारखान्यांना साखरेवर अवलंबून न राहता नवे मार्ग शोधण्याची संधी मिळाली आहे, केंद्राच्या सकारात्मक धोरणाचा आपण फायदा घेतला पाहिजे’’, असे दांडेगावकर म्हणाले.