पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा

परळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकला आहे. हा कारखाना सध्या बंदच आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या कारखान्याची स्थापना केली. तोच वैद्यनाथ कारखाना ज्या कारखान्याने कधी काळी राज्यात सर्वाधिक उसाचे गाळप केल्याचं रेकॉर्ड आहे. या कारखान्याच्या अंतर्गत गोपीनाथ मुंडे यांनी राज्यामध्ये अनेक कारखाने चालवायला घेतले होते.
या कारखान्यात तयार झालेली साखर कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्याला विकण्यात आली. मात्र त्याचा जीएसटी केंद्र सरकारकडे न भरल्याने जीएसटी चे अधिकारी थेट वैद्यनाथ कारखान्यात पोहोचले. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर आता कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली. जीएसटीचा नियम असा सांगतो की प्रत्येक महिन्याला जी साखर विक्री केली जाते त्याचा जीएसटी महिन्याच्या महिन्याला जमा करावा. मात्र 2019 पासून हा जीएसटी भरला नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
परळी वैद्यनाथ कारखान्यावर जवळपास 16 कोटीचा जीएसटी बुडवण्याचा आरोप आहे. साखर विक्रीतून जो जीएसटी भरणा अपेक्षित होतो तो भरला नाही . ज्यांना साखर विक्री केली त्यांच्याकडून जीएसटी घेतला मात्र तो जीएसटी कार्यालयाला भरला नाही असा आरोप आहे.
जीएसटी विभागाच्या दहा अधिकाऱ्यांनी काल दिवसभर कारखान्याची झाडाझडती घेतली. तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले. बिल, बॅलन्स शीट ही जप्त केले असून त्याची तपासणी सुरू आहे
गेल्या सहा ते सात वर्षापासून कारखाना आर्थिक संकटात आहे. तर दुसरीकडे वैद्यनाथ कारखान्याकडे जी जीएसटी बाकी आहे त्या संदर्भात कारखान्याकडून अनेकदा जीएसटी विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतः पंकजा मुंडे यांनी अमित शाह यांची देखील भेट घेतल्याचे त्या सांगितळे जाते.
आता हे प्रकरण केवळ जीएसटी संदर्भात असलं तरी याचे आता राजकीय प्रडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधक देखील आता पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईवरून आश्चर्य व्यक्त करत आहेत. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात असलेला दुरावा आणि त्यामध्येच त्यांच्या कारखान्यावर झालेली कारवाई त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का पोहोचणार का अशा देखील चर्चा होऊ लागल्या आहेत

“गोपीनाथ मुंडे यानाही तेव्हा राजकारणामुळे कर्ज मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रीय बँकांकडून अधिकच्या व्याजाने कर्ज घ्यावं लागलं. या सगळ्या गोष्टींचा तो परिणाम आहे. ही सगळी तांत्रिक कारणं आहेत. सध्या कारखान्यात कोणीच कामं करत नाहीयेत, त्यामुळे मी स्वत: कुलूप उघडून त्यांना कागदपत्रे दिली आहेत. हा तपास नेमका कसला आहे? हेही मला माहीत नाही. याबाबत मलाही हळुहळू कळेल,” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कारवाईसाठी पंकजा मुंडे यांचा कारखाना कसा भेटला असा सवाल त्यांनी केला आहे. स्वत:च्या पक्षाचे लोक डोईजड होतील म्हणून ही कारवाई होतेय का अशी शंका उपस्थित होत असल्याचे दानवे म्हणाले आहेत