पाटील भेटले गडकरींना

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. भेट पालखी मार्गाबाबत असली, तरी राजकीय चर्चांनाही ऊत आला आहे.
भाजपला अचानक सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शप) मध्ये जाणाऱ्या पाटील यांच्याबाबत वरिष्ठ भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याचेही पाटील यांचे प्रयत्न आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी पालखी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत, त्या कामांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने ती तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, अशी विनंती त्यांनी गडकरी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली.
या चर्चेदरम्यान पालखी मार्गाच्या दुरुस्ती, सुरक्षितता आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही मागण्या मांडण्यात आल्या. यावर प्रतिक्रिया देताना नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात येतील आणि कामांच्या गुणवत्तेबाबत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. देहू येथून सुरू होणारा हा पायी प्रवास पंढरपूरपर्यंत जातो. या मार्गावरून दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत जातात.
हा पवित्र मार्ग लोणी काळभोर, यवत, इंदापूर, बारामती आणि अकलुज या भागांतून पुढे जातो. सध्या हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 अंतर्गत विकसित केला जात असून, वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, रस्त्याची सुधारणा आणि वृक्षलागवड केली जात आहे.






