हार्वेस्टर अनुदान : दुसऱ्या सोडतीत आठशे जणांची निवड

पुणे : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीवाय) अनुदानावरील ऊसतोडणी यंत्र म्हणजे हार्वेस्टर खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त सुमारे ११ हजार ३४ अर्जामधून ८०० अर्जधारकांची निवड दुसऱ्यांदा झालेल्या संगणकीय सोडतीमध्ये नुकतीच करण्यात आली आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयातून मिळाली.
दरम्यान, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले की, ऊसतोडणी यंत्र अनुदान योजनेत पहिली सोडत ही राज्यस्तरीय होती. दुसऱ्या सोडतीमध्ये जिल्हानिहाय करण्यात आल्याने सर्वत्र ऊसतोडणी यंत्रांची उपलब्धता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. तसेच ग्रुप फार्मर्ससाठी (शेतकरी उत्पादक कंपन्या, साखर कारखाने, शेती सहकारी संस्था) खरेदी होणाऱ्या यंत्रासाठी १० टक्के वाटा राखून ठेवण्यात आला आहे.
संबंधितांना एसएमएसद्वारे निवड कळविण्यात आली असून, त्यांनी सात दिवसांत ऑनलाइनवर सर्व कागदपत्रे अपलोड करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून छाननी होऊन साखर आयुक्तालयातून ऊसतोडणी यंत्र अनुदान खरेदीस पूर्वसंमती दिली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कालावधीत ९०० ऊसतोडणी यंत्रखरेदीवर खरेदी किमतीच्या ४० टक्के अथवा ३५ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेत लेला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ऊसतोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पांतर्गत पहिल्या लॉटरीमध्ये साखर आयुक्तालयाने ३७३ अर्जदारांना ऊसतोडणी यंत्रखरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली होती; त्यापैकी १०० यंत्रे आरकेव्हीवाय अंतर्गत सन २०२२- २३ व २०२३-२४ या दोन वर्षे खरेदी करण्यात आली आहेत. त्या सोडतीमधील पहिल्या पाच यंत्रधारक लाभार्थ्यांच्या बँक कर्ज खात्यात एकूण १ कोटी ६९ लाख ७५ हजार ३१ रुपये इतके अनुदान २८ जून रोजी जमा करण्यात आलेले आहे.
साखर आयुक्तालयास योजनेनुसार कृषी आयुक्तालयाने आरकेव्हीवायमधून अनुदानासाठी आता नव्याने १४ कोटी रुपये दिलेले आहेत. त्यानुसार राज्यातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून आलेल्या ऑनलाइन अर्जानुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार येत्या आठवड्यात प्राप्त अनुदानातील रक्कम यादीनुसार वाटप करण्यात येईल. उर्वरित अनुदान रक्कम आल्यानंतर यादीतील पुढील लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.