ऊसतोडणी बांधवांच्या मुलांसाठी मोफत लसीकरण, आरोग्य तपासणी शिबीर

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा उपक्रम
पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी वाहतूक करणार्या मजुरांच्या लहान मुलांचे लसीकरण व मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
मंगळवार रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर ऊस तोडणी बांधवांकरिता कारखान्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, राहू, यांचे मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ऊस तोडणी मजुरांची सर्वसाधारण आरोग्य तपासणीमध्ये बी.पी., रक्तातील साखर, इ. तपासणी करण्यात आल्या. तसेच कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे मार्फत मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये प्रामुख्याने महिलांचे आरोग्य विषयक तपासणी करून त्यांना आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिरचा लाभ एकूण ४१ ऊस तोडणी वाहतूक बंधू-भगिनींनी घेतला आहे.
या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र, राहू च्या मार्फत ० ते ५ वर्ष वयाच्या बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये बी.सी.जी., पेंटा व गोवर या रोगांवरील लस बालकांना देण्यात आल्या. लहान मुलांना आहारमध्ये दूध, अंडी यांचा समावेश करणे. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ऊस तोडणी मजुरांना रोजच्या कष्टमय जीवनामधून मुलांना दवाखान्यात घेवून जाण्यास वेळ मिळत नाही. त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये तसेच मजुरांचेही आरोग्य चांगले राहावे म्हणून कारखाना व्यवस्थापन सतत प्रयत्नशील असते, असे मत कारखान्याचे अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊत यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी डॉ. नेहा जेधे (आरोग्य अधिकारी), डॉ. सुविधा नाईक (आरोग्य अधिकारी), डॉ. प्रविण गजरे, सौ. रत्नमाला ठाकरे (आरोग्य सहायिका), सौ. रोहिणी चौधरी (आरोग्य सेविका – लसीकरण), श्री. प्रसाद माकर (आरोग्य सेवक), श्री. आकाश कदम (आरोग्य सेवक), सौ. कावेरी कुंभार (आशा वर्कर स्वयंसेविका) यांनी आरोग्य तपासणीसाठी मोलाचे सहकार्य केले. आरोग्य सेविका रोहिणी चौधरी यांनी प्रत्यक्ष पालावर जाऊन मुलांचे लसीकरण केले. तसेच साखर शाळेच्या शिक्षिका (स्वयंसेविका) सौ. मीरा मोरे यांनीही लहान मुलांचा सर्वे करून यावेळी मोलाचे सहकार्य केले आहे.
ऊस तोडणी बांधवांचे आरोग्य चांगले रहावे या करीता कारखान्यावर दर आठवड्याला आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. आतापर्यंत दि. १९/११/२०२५, २६/११/२०२५, ०९/१२/२०२५, १६/१२/२०२५ व ०६/०१/२०२६ अशा पाच वेळा आरोग्य शिबिरांचे आयोजन कारखान्यामार्फत केलेले आहे.
मजुरांना पिण्यासाठी फिल्टर पाणी, शौचालय सुविधा, साखरशाळा, पाळणाघर, लाईट व्यवस्था, बैलांसाठी लसीकरण, पाणी पिण्यासाठी पाण्याचे हाळ, शेततळे, सभामंडप, कारखाना साईटवर निवासी डॉक्टर व दवाखाना, कारखान्यावर वास्तव्यास असलेल्या मुलांना आहार चांगला मिळावा या करिता जिल्हा परिषद मार्फत साखर शाळेतील मुलांना पोषण आहार इ, सुविधा मोफत पुरविल्या जात आहेत.
ऊस तोडणी मजुरांना मायेची ऊब मिळावी म्हणून कारखान्याने “माणुसकीची भिंत” हा अभिनव उपक्रम राबविला आहे. याठिकाणी परिसरातील नागरिक चांगल्या स्थितीतील कपडे, स्वेटर्स, चादर, इ. वस्तु ठेवून जातात. तोडणी वाहतूक मजूर हवे असलेल्या वस्तु येथून घेवून जातात व त्यांचा उपयोग करतात. यानिमित्ताने गरजू लोकांना मदत होत आहे. ऐन थंडीमध्ये त्यांना मायेची ऊब मिळत आहे.
मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या प्रसंगी कारखान्याचे कार्याध्यक्ष, श्री. विकास (अण्णा) रासकर, संचालक, श्री. किसन शिंदे, श्री. भगवान मेमाणे, श्री. लक्ष्मण कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. डी. एम. रासकर, केन मॅनेजर श्री. एस. बी. टिळेकर, शेतकी अधिकारी, श्री. ए. बी. शेंडगे, लेबर ऑफिसर, आर. बी. मापारे, शेतकी गटप्रमुख भाऊसाहेब फडतरे, किसन कदम, बापूराव शेलार, राजेंद्र थोरात, नितीन शिंदे, सुखदेव टेळे, तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कंत्राटदार व ऊस तोडणी बांधव व महिला उपस्थित होते.










