या राज्यात ऊस दर ४ हजारांवर

चंडीगड : पंजाब सरकारने राज्य ऊस शिफारस दरामध्ये (एसएपी) दहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील एसएपी प्रति क्विंटल ४०१ वर गेली आहे. म्हणजेच टनाला रू. ४०१० दर. याचबरोबर पंजाब हे देशातील सर्वाधिक ऊस दर देणारे राज्य ठरले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात ३७०० अधिकतम एसएपी आहे.
तसेच बिहारमधील नितीश कुमार सरकारने, एसएपीमध्ये २० रूपयांची वाढ केल्याने, ऊसाचा दर प्रति टन ३६५० वर गेला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी म्हटले आहे की, ऊस उत्पादकांच्या हितासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 10 रुपये दरवाढ दिली जात आहे.
ते म्हणाले की, पंजाब देशभरातील उसाला सर्वाधिक दर देणार असून, त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या वचनबद्धतेनुसार जास्तीत जास्त ऊस दरात राज्य देशात अग्रेसर राहील.
मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या सरकारने ऊस उत्पादकांना नेहमीच उच्च दर दिला आहे आणि आताही हाच ट्रेंड सुरू ठेवला आहे. ऊसाच्या सुरुवातीच्या वाणांसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४०१ रुपये आणि मध्य-उशिरा वाणांसाठी ३९१ रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.